अजित पवार गटाने सादर केली खोटी कागदपत्रे, शरद पवार गटाच्या वकिलांचा मोठा दावा

sharad pawar - ajit pawar

NCP Hearing : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यानंतर बोलताना शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठा दावा केला. अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली होती. आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे असून त्यावर आज (शुक्रवार, 6 ऑक्टोबर) सुनावणी झाली. या सुनावणीसाठी शरद पवार निवडणूक आयोगाकडे हजर झाले होते. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांनी दोन तास युक्तिवाद केला. आता पुढील सुनावणी सोमवारी चार वाजता होणार आहे.

अजित पवार गटाने बनावट कागदपत्रे सादर केली

सुनावणीनंतर राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. अजित पवार गटाकडून बनावट कागदपत्रे सादर केल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. सुमारे दोन तास सुनावणी सुरू होती. आम्ही म्हणालो, आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय पक्षात वाद असल्याचे सिद्ध करू नका.

दुसऱ्या गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळेल. अजित पवार गटाकडून अनेक बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. मृताचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. आम्ही पुरावे दिले आहेत. पुढील सुनावणीत आणखी पुरावे दिले जातील. अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत.

सुप्रीम कोर्टात शरद पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत शरद पवार गट आक्रमक झाला आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर थेट कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. या याचिकेवर 9 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे.

जयंत पाटल यांची नियुक्ती बेकायदेशीर

शरद पवार गटाने जयंत पाटल यांची प्रदेशाध्यक्षपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद अजित पवार यांचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे. अजित पवार गटाच्या वकिलांनीही निवडणूक आयोगासमोर आमदारांची संख्या आमच्याकडे असल्याचा दावा केला. पक्षातील यापूर्वी झालेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला.

30 जून रोजी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. आपल्याकडे विधिमंडळ आणि संसदीय बहुमत आहे. शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे पत्र अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाहीत. तसेच, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत असल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाने केला.