अजित पवारांचा दुसरा मुलगा जय पवारही राजकारणात नशीब आजमावणार?

Jay Pawar - Ajit Pawar

बारामती, 29 ऑगस्ट | जय दादा तुम्ही आता बारामतीत सक्रिय व्हा. अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आता बारामतीत या, असे बारामतीतील कार्यकर्त्यांनी आपुलकीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांना मंगळवारी सांगितले.

याबद्दल सर्व अजितदादांना विचारा. त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करतो, असे आश्वासन जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. शनिवारी बारामतीत अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अजित पवार यांच्यासह पार्थ पवार वाहनात नागरिकांचे अभिवादन स्वीकारत होते.

सत्कार समारंभाला उपस्थित राहू न शकलेले जय पवार मंगळवारी बारामतीत आले. बारामती येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव उपस्थित होते.

पंचनामा : आगामी निवडणुकांत ‘इगो’ बाजूला सारून लढावे लागेल

जय पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी बारामतीत ‘जय दादा’ सक्रिय व्हावे, अशी प्रेमळ विनंती केली.

तेव्हा त्यांनी याबाबत अजितदादांना विचारा. त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करू, असे आश्वासन जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात पार्थ पवार यांच्यासह जय पवार यांना सक्रिय करावे, अशी थेट मागणी आता अजित पवार यांच्याकडे करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांच्या मिरवणुकीत पार्थ पवार सोबत होते. मुंबईतील सभेत अजित पवारांच्या भाषणादरम्यान जय पवार संपूर्ण वेळ अजितदादांच्या मागे उभे राहिले. जय पवार यांनीही आज बारामतीचा दौरा केल्याने भविष्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More 

मोठा निर्णय : अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी? पुण्यातील राजकारण बदलणार?