Politics | अमित शहा आणि शिंदे-फडणवीस बंद दाराआड चर्चा, अजित पवार गैरहजर

मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्ताने ते मुंबईत आले आहेत. त्यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुंबई विमानतळावर आल्यानंतर अमित शहा वांद्रे येथे गेले. तिथे त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

त्यानंतर ते लालबागला आले. त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. लगबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आले. वर्षा येथे त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी आले. ‘सागर’ बंगल्यावर अमित शहांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड चर्चा झाली.

काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. अजित पवार सध्या त्यांच्या नियोजित बारामती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती आहे.

बंद दाराआड चर्चेत काय झालं?

अमित शहा आणि शिंदे-फडणवीस यांच्यात ‘सागर’ बंगल्यावर 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सोमवारपासून सुनावणी सुरू होणार आहे.

या संदर्भात या बैठकीत रणनीती ठरविण्यात आली आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या तयारीबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. ‘सागर’ बंगल्यावर अन्य भाजप आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. मात्र अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांनी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे या चर्चेचे फलित लवकरच राजकारणात पाहायला मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, सागर बंगल्यावरील बैठकीनंतर हे तीन प्रमुख नेते सह्याद्री अतिथीगृहावर आले.

‘सह्याद्री’वरही बंद दाराआड चर्चा

विशेष म्हणजे अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी अमित शहा यांनी तिन्ही सत्ताधारी पक्षांमधील समन्वयाचा आढावा घेतला. तसेच या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, लोकसभा निवडणुकीवरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. तसेच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा मुंबईत कार्यक्रम होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Read More 

ही तर लाचारांची औलाद; विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्यावर खोचक टीका