देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता, देवणीकरांचा स्वप्नभंग

मुंबई : महाराष्ट्र राज्य हे लाल कंधारी व देवणी या देशी गोवंशाचे पैदास क्षेत्र/स्थान (Home Track) आहे. सदर प्रजातींचे प्रामुख्याने मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्हयात अस्तित्व आहे.

लाल कंधारी व देवणी गोवंश हे देशी प्रकारातील असून, सदर गायींचे दूध हे संकरीत गोवंशीय पशुधनाच्या दूधापेक्षा जास्त पौष्टीक असल्याने सदर दूधास चांगली मागणी असून, दरही जास्त मिळतो. तसेच नर पशुधन हे शेतीकामासाठी उपयोगी आहेत.

स्थानिक किंवा देशी गोवंशीय पशुधनाचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या पशु प्रदर्शनांमध्ये महाराष्ट्र राज्यातील लाल कंधारी व देवणी गोवंशीय पशुधनास नेहमीच राष्ट्रीय पारितोषिके प्राप्त होत असतात. त्यामुळे या जातींचे जतन व संवर्धन करण्यास पुढाकार घेणे ही काळाची गरज ठरते.

सन 2013 मध्ये केलेल्या जात निहाय सर्वेक्षणानुसार लाल कंधारी व देवणी गोवंशीय पशुधनाची संख्या अनुक्रमे 1,26,609 व 4,56,768 इतकी होती. सन 2019 च्या पशुगणनेत लालकंधारी व देवणी गोवंशीय पशुधनाची संख्या अनुक्रमे 1,23,943 व 1,49,159 इतकी आहे. सदर आकडेवारी विचारात घेता लालकंधारी व देवणी गोवंशीय पशुधनाच्या संख्येत विशेषत: देवणी प्रजातीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सदर घटीचे प्रमाण विचारात घेता कालौघात सदर प्रजाती नामशेष होण्याची दाट शक्यता आहे.

केंद्र शासनाकडूनही स्थानिक जातींच्या गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी “राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)” योजनेद्वारे प्रोत्साहन देण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून राज्यातील लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आला आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पशुपैदास प्रक्षेत्र उभारण्यासाठी भांडवली खर्च केद्र शासनाकडून प्राप्त होईल.

मात्र खेळत्या भांडवलाची तसेच मनुष्यबळाची उपलब्धता लाभार्थ्यांनी म्हणजे राज्य शासनाने करावयाची आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित मौजे साकुड, ता. अंबेजोगाई, जि. बीड येथे लाल कंधारी व देवणी गोवंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र कार्यान्वित करण्यास मान्यता व मनुष्यबळ तसेच खेळत्या भांडवलासाठी आर्थिक तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

राज्यातील लाल कंधारी व देवणी या देशी गोवंशीय पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सदर गोवंशीय प्रजाती या दुग्धोत्पादनासाठी तसेच त्यांच्यापासून जन्मलेली नर वासरे ही शेती कामासाठी उपयोगी असल्याने सदर जातींचे जतन व संवर्धन होण्याची आवश्यकता विचारात घेऊन, मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे असलेल्या 81 हेक्टर जागेत लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.