IND vs AUS Final | ऑस्ट्रेलियाचे विक्रमी विश्वविजेतेपद आणि 140 कोटी भारतीयांचा स्वप्न भंग;

अहमदाबाद : ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतावर मात करत विश्वचषक जिंकला. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत सर्वबाद झाला होता. यावेळी ट्रॅव्हिसच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना सहज जिंकला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा गडी राखून विजय मिळवला.

मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात पुन्हा एकदा भारताला विकेट मिळवून दिली. डेव्हिड वॉर्नरला बाद करून शमीने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनाही बाद केले. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला रोखून धरले. कारण भारताने ऑस्ट्रेलियाची सात षटकांत 3 बाद 47 अशी अवस्था केली होती.

त्यानंतर भारताचे फिरकीपटू संघाच्या विकेट घेतील असे वाटत होते. मात्र यावेळी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने निराशा केली. कारण ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी शतकी भागीदारी करून त्यांना विजयाच्या जवळ आणले. हेडने यावेळी दमदार शतक झळकावून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. हे दोघे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून देणार असे वाटत होते.

प्रथम फलंदाजी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माने 47 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर विराट कोहलीने 54 धावा करत पुन्हा एकदा दमदार खेळी केली. मात्र अर्धशतक झाल्यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. यावेळी फायनलमध्ये कोहलीला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र यात तो अपयशी ठरल्याचे दिसून आले. कोहली बाद झाला आणि भारत अडचणीत आला. त्यावेळी लोकेश राहुल भारताच्या मदतीला धावून आला.

कारण राहुलने यावेळी संयमी खेळी खेळत केवळ एका चौकारासह 66 धावा केल्या. त्यामुळे यावेळी भारताला 200 धावांचा टप्पा गाठता आला. शेवटच्या षटकांमध्ये भारताला मोठा फटका मारता आला नाही आणि त्यामुळेच त्यांना 240 धावांवर समाधान मानावे लागले. या सामन्यात भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारेल असे अनेकांना वाटत होते. पण या सामन्यात फलंदाजांची साफ निराशा झाली आणि त्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.