उदगीरात बॅनरबाजीला उधाण, जागोजागी बॅनरची लक्तरे लटकलेली, लातूरात परवानगीशिवाय लावलेले बॅनर हटविले

remove the banners placed in the city without permission

उदगीर : नगरपालिकेने शहरातील व्यापारी व नागरिकांना आवाहन करून बॅनर, पोस्टर व जाहिराती लावण्यासाठी परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या असताना देखील विनापरवाना बॅनरबाजीचे उधाण आले आहे. अनेक बॅनर मुदत संपल्या नंतरही फाटलेले बॅनर तसेच खांबावर लटकत आहेत. शहरातील स्ट्रीट पोल वर देखील बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. शहरातील रोड डिव्हायडर मध्ये लाखो रुपये खर्चून पोल उभारण्यात आले, पण त्यावर दिवे काही लागले नाहीत. बॅनर मात्र रोज लागत आहेत.

शहरातील रोड डिव्हायडर मधील खांबावर शहरातील डीजीटल नेते आपल्या हक्काचे खांब समजून मनसोक्त जाहिराती बाजी करण्यासाठी बिनदिक्कत वापरत आहेत. एक दिवस शहरातील खांब रिकामे नाही. या खांबावर बिनदिक्कत बॅनरबाजी केली जात आहे. शहरात आठ दिवसाला एकदा शेकडो बॅनर लावले जातात, यात परवाना घेतलेले किती आणि बिना परवाना किती याची कोणाला कल्पना नाही. शहरातील काही ठिकाणी तर उंच टावर उभारले जातात, त्याच्या मुळे अनेकदा छोटे मोठे अपघात झाले आहेत, पण त्याकडे राजकीय दबावामुळे कोणी लक्ष देत नाही.

शहरातील उंच टावरवर कायम काही नेत्यांचे आठ पंधरा दिवसाला एकदा बॅनर बदलून लावले जाते, त्यासाठी टावरचा सांगाडा कायम उभा असतो. या बॅनरमुळे शहर बकाल आणि भकास होण्याबरोबर पर्यावरणाचे प्रदूषण देखील वाढत आहे. बॅनरसाठी वापरले जाणारे प्लास्टिक, इंक व इतर केमिकल अतिशय विषारी असल्याने पर्यावरणाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्यासोबत या बॅनरबाजीला शहरातील नागरिक कंटाळून गेले आहेत.

लातूर शहरात परवानगीशिवाय लावलेले बॅनर हटविले

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेने मंगळवारी शहरात परवानगीशिवाय लावलेले बॅनर हटविण्याची कारवाई केली. 7 ऑक्टोबर रोजी करण्यात आली. परवानगी न घेता कोणीही बॅनर लावू नये अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही पालिकेने दिला आहे.

अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, कमानींबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. दि. 31 जानेवारी 2017 नुसार, महाराष्ट्र मालमत्ता गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा 1995 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायदा 1949 अंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यासाठी उपायुक्त (सामान्य) यांची नोडल अधिकारी आणि विभागीय अधिकारी म्हणून विभागीय अधिकृत अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांची प्रभाग अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरपालिकेने शहरातील व्यापारी व नागरिकांना आवाहन करून पोस्टर व जाहिराती लावण्यासाठी परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयात बंदोबस्त असतानाही शहरातील विविध भागात अनधिकृत पोस्टर्स लावण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने थेट कारवाई करत मंगळवारी चारही झोनमधील 103 अनधिकृत बॅनर हटवले. क्षेत्र अधिकारी कलीम शेख यांनी ‘अ’ झोनमध्ये 27 बॅनर काढून टाकले, ‘ब’ झोनमध्ये झोनल अधिकारी विजय राजुरे यांनी कारवाई केली, ‘क’ झोनमध्ये पवन सुरवसे यांनी 20 बॅनर तर ‘ड’ झोनमध्ये झोनल अधिकारी बंडू किसवे यांनी 26 बॅनर्स काढले.