Assembly Election 2023 | हिमाचल आणि कर्नाटकातून धडा घेत मध्यप्रदेश-राजस्थानात भाजपची सावध वाटचाल, बंडखोरी व नाराजी कायम

Assembly Election 2023

Assembly Election 2023 | हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील स्थानिक नेतृत्वाच्या दुर्लक्षाचा जबर फटका बसलेल्या भाजपने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील तिकीट वाटपात थोड्या उशिराने धडा घेतला आहे. मात्र हा धडा घेऊनही पक्षात बंडखोरीचा सूर कायम आहे. भाजप हे एक कुटुंब आहे, कुटुंबात नाराजी व रुसवे फुगवे सुरूच असतात. त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे नेत्यांचे म्हणणे आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीत उमेदवार बनवलेल्या खासदारांना काही तास अगोदरच कळवले जाते, असेच काहीसे राजस्थानच्या पहिल्या यादीतही पाहायला मिळाले.

ते म्हणाले की, यातून भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संदेश गेला की सर्व काही केंद्रीय नेतृत्व ठरवत आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी दिसून आली, त्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्र्यांसह केंद्रीय नेतृत्वाने स्थानिक नेतृत्वासोबत अनेक बैठका घेतल्या. यानंतर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून पक्षाने जी चूक केली होती, त्याची पुनरावृत्ती या निवडणुकांमध्ये होऊ नये, असे नेत्यांनी ठरविले आहे.

या निर्णयानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या यादीत स्थानिक नेत्यांनाच स्थान मिळाले आहे. त्यामुळे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी या दोन ज्येष्ठ नेत्यांबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरु होत्या, त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय नेत्यांच्या निर्णयामुळे स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. भाजपाने आपली चूक दुरुस्त केलेली असली तरी या दोन राज्यात भाजपमधील बंडखोरी ही मोठी डोकेदुखी ठरणारी आहे आहे.

नरपत सिंह राजवी यांना तिकीट मिळाल्याने चंद्रभान सिंह आक्या नाराज

दुसऱ्या यादीत नरपत सिंह राजवी यांना चित्तोडगड विधानसभेचे तिकीट मिळाले आहे. आमदार चंद्रभान सिंह आक्या यांच्या समर्थकांमध्ये असंतोष दिसून येत आहे. दोन दिवसांत आपले नाव जाहीर न केल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे अक्याने यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले आहे. दरम्यान, राजवी म्हणाले की ते आक्या यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतील, आक्या ऐकतील असा विश्वास त्यांना वाटत आहे.

सहादा येथे भाजपने उमेदवारी दिलेल्या लाडूलाल पितलिया यांच्या विरोधात परिसरातून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. जाट समाजाचे म्हणणे आहे की, सहादा विधानसभा मतदारसंघातून जाट समाजाला 42 वर्षांपासून प्रतिनिधित्व मिळत आहे, मात्र यावेळी समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये तिकीट न मिळालेले नेते आणि त्यांचे समर्थक भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरापुढे निदर्शने करत आहेत. बंडखोरांशी बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र समितीचे कोणीही ऐकायला तयार नाही, केंद्रीय समिती एकाला विनवत आहे, तर तो पर्यंत दुसरा नाराज होत आहे.

मध्य प्रदेशातही बंडखोरी

त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातही भाजपला आपल्याच लोकांकडून बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. बुरहानपूरमध्ये भाजपने माजी मंत्री अर्चना चिटणीस यांना तिकीट दिले आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांचे पुत्र हर्षवर्धन सिंह चौहान याला विरोध करत असून त्यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

रीवा जिल्ह्यातील मंगवान विधानसभेतून भाजपचे आमदार पंचुलाल प्रजापती यांचे तिकीट रद्द झाल्यानंतर ते दुःखी झाले आणि ढसाढसा रडले. त्यांच्या जागी पक्षाने नरेंद्र प्रजापती यांना उमेदवारी दिली आहे. आपल्या पत्नीला भाजपकडून तिकीट मिळेल असा विश्वास त्यांना होता, पक्षाने त्यांचे मत विचारात न घेतल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छतरपूर जिल्ह्यातील चांदला मतदारसंघातून भाजपचे आमदार राजेश प्रजापती यांना तिकीट नाकारण्यात आल्याने ते रडू लागले. भाजपने आमदार राजेश प्रजापती यांचे तिकीट रद्द करून दिलीप अहिरवार यांना तिकीट दिले आहे. सिहोर जिल्ह्यातील आष्टा विधानसभा मतदारसंघातून भाजपने घोषित केलेले उमेदवार गोपाल सिंह यांच्या विरोधात लोक निदर्शन करीत आहेत. आष्टा येथील भाजप आमदार रघुनाथ सिंह मालवीय कार्यकर्त्यांना संबोधित करताना हमसू-हमसून रडू लागले.