छत्रपती संभाजीनगर : केंब्रिज चौकात विवाहितेवर सामूहिक बलात्कार; तिघांनी केला आळीपाळीने बलात्कार

crime-batminama

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एका 35 वर्षीय विवाहितेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (5 एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. तिघांनी विवाहितेला केंब्रिज चौकाजवळील सूर्या लॉन्सच्या बाजूला असलेल्या झुडपात ओढत नेऊन तिचे हात-पाय बांधून तिच्यावर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला.

विवाहितेने पतीसह सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्यानंतर एकनाथ नामदेव केदारे (25, आडगाव) याला तत्काळ अटक करण्यात आली. अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे. तक्रारदार विवाहित पिसादेवी रोड परिसरात राहतात. तिने मानलेल्या भावाला उधार पैसे मागितल्यानंतर त्याने एकनाथला मित्राकडे दोन हजार रुपये आणायला पाठवले. तो तिला बाईकवर बसवून सूर्या लॉन्सच्या बाजूला घेऊन गेला. त्याचे दोन साथीदार तिथे आधीच होते.

तिघांनी मिळून तिला झुडपात ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करण्यात आली. तिचे मंगळसूत्र आणि मोबाईल हिसकावून घेतला. बलात्कारानंतर विवाहितेलाही सोडून तिघेही पळून गेले. तिने स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी आली आणि घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.