Crime News : पोलिसवाला पती, पत्नीचे दुसऱ्या सोबत जडले ‘अवैध’ नाते, कॉन्स्टेबलने तिच्या प्रियकराच्या डोक्यातच गोळी झाडली

crime-batminama

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या व्यावसायिकाच्या खुनाची उकल करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांनीच व्यापारी सचिन नरोडे यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रामीण दलात कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याच्यासह अन्य एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. रामेश्वर काळे हा गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडेच्या मागावर होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 17 मार्च रोजी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. वाळज परिसरातील साजापूर शिवारात डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून त्यांचा खून झाल्याची फिर्याद एमआयडीसी वाळज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. तेव्हापासून गुन्हे शाखा आणि वाळज पोलिसांसह पाच पथके आरोपींचा शोध घेत होती.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाला त्यात यश आले आहे. हा खून ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदाराने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यासोबत त्याचा साथीदारही होता. विशेष म्हणजे या रामेश्वर सीताराम काळे हेडकॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत निलंबित करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस दलात कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर सीताराम काळे आणि लक्ष्मण जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला मयत व्यापारी सचिन नरोडे याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आरोपी काळे हा गेल्या दोन महिन्यांपासून मयत व्यावसायिकाच्या मागावर होता. रविवारी रात्री साजापूर परिसरात वीज नव्हती. त्याचा फायदा घेत आरोपींनी व्यावसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली.