मुख्यमंत्र्यांनी दुर्धर आजारांवर मात करणाऱ्या मुलांसोबत साजरी केली दिवाळी

Chief Minister Eknath Shinde celebrated Diwali with 50 children

मुंबई : सर…. तुमच्या मदतीने आम्ही रोगांविरुद्धची लढाई जिंकली आहे, आता फक्त पाठीवर हात ठेवून लढा म्हणा, आम्ही आमच्या आयुष्याची लढाईही जिंकू, अशी भावना त्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतून व्यक्त होत होती. निमित्त होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित दिवाळी कार्यक्रमाचे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या मदतीने हृदय शस्त्रक्रिया, कर्करोग, जन्मजात कर्णबधिर (कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया), बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि इतर आजारांसारख्या गंभीर आजारांवर मात केलेल्या 50 मुलांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिवाळी हा कौटुंबिक सोहळा असून गेल्या वर्षी मी या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता तुमच्यासोबत दिवाळी साजरी करत आहे. सर्वसामान्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करण्याचे काम आम्ही गेली अनेक वर्षे करत आलो आहोत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य अशा विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांसाठी हेच काम करत आहोत.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम अव्याहतपणे सुरू असून राज्यातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची शासन काळजी घेईल. आजारी पडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. राज्यात उपलब्ध नसलेले उपचार परदेशातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅशलेस सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या काळातही आपण सर्वांनी चांगले काम केले असून यावर्षी दिवाळीसह सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करत आहोत.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, एचसीजी (HCG) मानवता कॅन्सर हॉस्पिटल, नाशिकचे डॉ.राज नगरकर, ठाणे येथील भूमकर हॉस्पिटलचे डॉ.आशिष भूमकर, यशश्री हॉस्पिटल सांगलीचे कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.सुधीर कदम, ज्युपिटर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशुतोष सिंह, डॉ.श्रीनिवास सर, कोकलीयर इंप्लान्ट शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.अजय ठक्कर, डॉ.उप्पल सर, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मंगेश चिवटे आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी उपस्थित मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्धर आजारांवर मात केलेल्या उपस्थित बालकांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.