‘आनंदाचा शिधा’ मध्ये मैदा, पोह्याचा समावेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या शिध्यामध्ये चणा डाळ आणि रवा अध्र्या किलोने कमी करून त्यात प्रत्येकी अर्धा किलो मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला आहे.

याआधी ‘आनंदाचा शिधा’ या संचात प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असे चार जिन्नस होते. मात्र आता त्यात दोन जिन्नसांची भर पडली आहे. त्यात आता एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय़ रेषेवरील केशरी शेतकरी अशा 1 कोटी 66 लाख 71 हजार शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबपर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास आणि त्यासाठी 45 पदांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सध्या नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयांमध्ये 8 हजार 418 न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. नवीन न्यायालयांच्या उभारणीपोटी पाच कोटी 60 लाख 54 हजार खर्चासही मान्यता देण्यात आली.