यह डर अच्छा लगा, माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दौरे रद्द केले : आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thakrey-Eknath Shinde

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर तुफान हल्ला चढवला आहे. जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री आणि मंत्री परदेश दौऱ्यावर जात आहेत; पण ते तिथे नक्की काय करणार आहेत? कोणाला भेटणार आहेत, कोणत्या कंपन्या भेटणार हे माहीत नाही. त्यामुळे या दौऱ्यांना सुट्ट्या मानल्या जाऊ लागल्या आहेत का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. माझ्या टीकेनंतर मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दोन दौरे रद्द केले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

राज्यात घटनाबाह्य सरकार बसले आहे. फक्त घोटाळे करीत आहे, 6 हजार कोटींचा रस्ता घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळाही लोकायुक्तांकडे आम्ही नेणार आहोत. मुख्यमंत्री फक्त निविदा शोधत आहेत. या सरकारमधील अनेकांना परदेश दौरे करायला आवडतात. या सुट्ट्या समजून वागत आहेत. या दौऱ्यातून काय निष्पन्न होते? मुख्यमंत्र्यांचा दौरा लंडन, जर्मनीला होता.

हायवे पाहण्यासाठी ते जर्मनीला जाणार होते. मी प्रश्न विचारला, तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहेत? डाओसमध्ये आम्ही जे केले ते समोर आणले. मुख्यमंत्री खरेच परदेशात जाणार का? असा सवाल केला असता मुख्यमंत्र्यांनी 30 मिनिटांत दौरा रद्द केला. यह डर अच्छा है, असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

राहुल नार्वेकर यांचा दौराही रद्द 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही घानाला जाणार आहेत. पण इथे तुम्ही आमदार अपात्रतेचे प्रकरण रखडवून संसदीय लोकशाहीची हत्या करत आहात. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निकाल दिला. 4 महिने झाले, तेव्हापासून निकाल पुढे ढकलला जात आहे. मी अध्यक्षांना विनंती केली की, जाऊन राज्याची बदनामी करू नका. त्यानंतर हा दौरा रद्द झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

जनतेचा पैसा वाया घालवू नका

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा परदेश दौरा नेमका काय आहे, हे त्यांनी सांगावे. जिथे जायचे आहे तिथे जा, पण जनतेचा पैसा वाया घालवू नका. उद्योगमंत्री सामंत यांचा हा तिसरा परदेश दौरा आहे. राउंड टेबल कॉन्फरन्सला जातोय, कोणाला भेटणार? कोणत्या कंपन्या येतील? काहीही स्पष्ट नाही.

व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर वाघ नखांबद्दल माहिती मिळाली. वाघ नखे शिवाजी महाराजांनी वापरले होते की नाही असे त्यात म्हटले आहे. हे वाघ नखं शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत की शिवाजी महाराजांचे? हे देखील विचारले, तर त्यांना तेही नीट माहित नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पाहणी दौरे करायचे असतील तर खारघरमध्ये जिथे अपघात झाला तिथे का जात नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.