Crime News : मुलं सारखं रडत असल्याने होत होती झोपमोड; जन्मदात्या आईनेच तान्हुल्याचा घोटला गळा

Crime-News-murder

जयपूर : प्रत्येक आईसाठी बाळांचे संगोपन करणे आनंददायी गोष्ट असते. काही वेळा जर मुल जास्त रडले किंवा त्रास दिला तर पालकांना त्रास होतो. अर्थात हे सामान्य आहे; मात्र या प्रकारामुळे गंभीर गुन्हे घडले आहेत, असे खूप कमी पाहायला मिळते. राजस्थानमध्ये एका महिलेने आपल्या नवजात बाळाची निर्घृण हत्या केली. बाळाचे रडणे असह्य झाल्याने त्याच्या आईने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये 43 दिवसांच्या नवजात बालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली आहे. या महिलेने आपल्या नवजात बाळाचा ब्लेडने गळा चिरून खून केला. या घटनेनंतर महिला अनेक दिवस पोलिसांची दिशाभूल करत होती; मात्र अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. महिलेने हत्येचे कारण सांगितल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. माझा लहान मुलगा दिवसभर रडायचा. त्याचा त्रास होत होता. मी त्याला मारल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. अंजुम असे या महिला आरोपीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली आहे.

अंजुमने पोलिसांना सांगितले की, प्रसूतीनंतर माझा मुलगा सतत रडत होता. त्यामुळे मला झोप येत नव्हती. २ मार्चला माझा मुलगा खूप रडत होता. त्यामुळे रागाच्या भरात मी या नवजात बाळाची हत्या केली. रामगंजचे एसएचओ उदय सिंह यांनी सांगितले की, अंजुम पोलिसांच्या ताब्यात असून तिच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान, अटकेत असलेल्या अंजुमला तिच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. अर्थात आता पश्चाताप करून उपयोग नाही. कारण तिच्या रागामुळे एका नवजात बालकाचा बळी गेला आहे. जयपूरमधील रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या परिसरात राहणाऱ्या अंजुमच्या घरातून आरडाओरडा झाल्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आला. आवाज ऐकून शेजारी आणि कुटुंबातील काही सदस्य तिच्याकडे धावले असता अंजुमच्या मांडीवर नवजात अर्भक होते आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

या बाळाचा गळा चिरला होता. रक्ताची धार होती. ‘मी माझ्या मुलाला मारले’ असे अंजुम ओरडत होती. लोकांनी तात्काळ बाळाला रुग्णालयात दाखल केले; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अंजुमला आणखी दोन मुले आहेत, एक 12 वर्षांचा आणि एक 15 वर्षांचा आहेत. ती बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्याचवेळी कुटुंबातील एका व्यक्तीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. कुटुंबातील एका सदस्याने पोलिसांना सांगितले की, माझ्या पुतण्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. अंजुमची चौकशी केली असता तिच्या जबाबावरून पोलिसांना संशय आला. सुरुवातीचे काही दिवस ती पोलिसांची दिशाभूल करत होती; मात्र तिच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली. तपासादरम्यान अंजुम पूर्णवेळ जखमी बाळासोबत रुग्णालयातच राहिली; पण काही दिवसातच बाळाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, अनेक गोष्टींमुळे पोलिसांना अंजुमचा संशय आला. त्यांनी तिची कसून चौकशी केली. अखेर अंजुमने गुन्ह्याची कबुली दिली.