Crime News | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव, 35 वर्षीय पत्नीला अटक

Crime-News-murder

नालासोपारा, 26 ऑगस्ट | पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर महिलेने पतीला अपघात झाल्याचा बनाव केला. खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी सहा जणांवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईजवळील नालासोपारा परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. कळंब येथील समुद्रकिनारी नालासोपारा पूर्वेला राहणारा रियाज अली (वय 55) हा त्याची पत्नी मन्सुरा (वय 35) आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांसह फिरायला गेला होता.

तिथे रियाज अलीला ‘अपघात’ झाल्याचे सांगत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी रियाजची पत्नी मन्सूराची चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. तपासादरम्यान पतीचा अपघात कुठे आणि कसा झाला? याबद्दल त्यांच्या पत्नीला घटनेबाबत ठोस माहिती देता आली नाही.

शरद पवार यांचा मोठा दावा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठीच घेतल्या जात नाहीत?

पोलिसांचा संशय बळावत असताना पोलिसांनी तिची कसून चौकशी केली, त्यात पत्नी मन्सूराने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पत्नी मन्सुरा आणि तिचा प्रियकर गणेश पंडित यांना अटक करण्यात आली असून अन्य सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रियाजची पत्नी मन्सुरा नालासोपारा येथील गणेश पंडित यांच्या किराणा दुकानात काम करते, तिथे त्यांचे प्रेम संबंध जुळून आले होते. या प्रेमप्रकरणात पती रियाज अडथळा ठरत असल्याने त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला.

त्यानुसार 21 ऑगस्ट रोजी पत्नी मन्सूराने पती रियाजला फिरायला जाण्याच्या बहाण्याने कळंब समुद्रकिनारी नेले. तिथे तिचा प्रियकर व इतर साथीदारांच्या मदतीने पती रियाजची हत्या करण्यात आली. या जोडप्याला दोन मुलेही आहेत.