देवणी गोवंश आमचा वारसा व ओळख आहे, त्यासाठी तीव्र आंदोलन करणार; बैठकीत आंदोलनाचा निर्धार

देवणी : येथील जनतेला अपेक्षित असणारे देवणी देशी गोवंशीय पशुधन जातींचे जतन व संवर्धन केंद्र मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे करण्याचे आदेश दि.11 रोजी शासनाने जारी केले आहेत. या निर्णयाच्या विरोधात आज दि. 13 रोजी देवणी येथील विष्णू मंदिरात व्यापक बैठक घेण्यात आली.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हावगीराव पाटील उपस्थित होते. या बैठकीसाठी उदगीर येथील शासकीय दूध डेअरी पुनरुज्जीवन समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. बैठकीचे प्रास्ताविक आनंद उर्फ पृथ्वीराज जिवणे पाटील यांनी केले.

बैठक सुरू असताना लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी मोबाईल वरून बैठकीस संबोधित करून, दोन दिवसात देवणी येथील सर्व पक्षीय नेत्यांशी व शेतकऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगून, सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत बोलताना आशिष पाटील राजूरकर यांनी म्हटले की, देवणी संशोधन केंद्र लातूर जिल्ह्याबाहेर जाणे स्थानिक नेत्यांचे राजकीय अपयश आहे. आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना देवणी गोवंश संशोधन केंद्राचे महत्त्व कळलेले नाही, त्यामुळे अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. उदगीरची दूध डेअरी चालू झाली पाहिजे. गोवंश संशोधन केंद्र उदगीर, देवणी व जळकोट परिसरात झाले पाहिजे, ही मागणी केली तर चूक काय आहे. हा आमचा हक्क आहे. सरकार उदगीर तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहे का? अशी शंका वाटू लागली आहे. देवणी गोवंश संशोधन केंद्र अंबाजोगाईला सुरू करण्याचा निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन केले पाहिजे.

अहमद सरवर यांनी म्हटले की, दूध डेअरी संदर्भात जेव्हा तुकाराम मुंडे यांची भेट घेतली, तेव्हा त्यांचे दूध डेअरी आणि गोवंश संशोधन केंद्राबद्दल सरकारचे प्रतिनिधी म्हणून अतिशय नकारात्मक मत होते. आपल्या लोकप्रतिनिधींना गोवंश संशोधन केंद्राचे महत्व पटवून देता आले नाही. त्यामुळे संशोधन केंद्र उदगीर व देवणी येथे न होता, अंबाजोगाई येथे होत आहे. हे निव्वळ राजकीय अपयश व उदासीनता आहे. हा निर्णय अतिशय निंदनीय आहे, याला विरोध करताना राजकारणाचा स्पर्श होऊ देऊ नका. आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा, उदगीर व जलकोट तालुक्यातील जनता सोबत आहे.

डॉ.अरविंद भातांब्रे यांनी म्हटले की, एवढा मोठा प्रकल्प जिल्ह्याबाहेर जातोय, याची कल्पना सत्ताधारी पक्षातल्या लोकप्रतिनिधींना नाही. जिल्ह्यातले मंत्री बैठकीत असताना जर हा निर्णय झाला असेल तर तो अत्यंत दुर्दैवी आहे. देवणीच्या पशुपालकांच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस आहे.

प्रा. एस. एस. पाटील यांनी म्हटले की, हा निर्णय देवणी गोवंश पाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान आहे. देवणी गोवंश राष्ट्रीय पातळीवर अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे. देवणी गोवंशाचे देवणीच्या मातीत संशोधन होणे गरजेचे आहे. जर देवणी गोवंशाचे संशोधन पर जिल्ह्यात होणार असेल तर ते आपल्यासाठी शरमेची बाब आहे.

मोतीलाल डोईझोडे यांनी म्हटले की, उदगीर, देवणी व जळकोट तालुक्याची ओळख देवणी जातीच्या वळू आणि गाई मुळे आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे देवणी गोवंशाचा खरा हकदार असणारा शेतकरी पेटून उठला आहे. देवणी तालुक्याची अस्मिता पुसण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात असतील तर देवणी तालुक्यातील जनतेने सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध केला पाहिजे.

ॲड. नरेश सोनवणे म्हणाले की, आता ही लढाई अनेक पातळीवर लढावी लागणार आहे, सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा म्हणून त्याच्यावर दबाव वाढविला पाहिजे.

देवणीचे उद्योजक शेषराव मानकरी म्हणाले की, देवणीच्या जनतेने गप्प न बसता लोक चळवळी सोबतच न्यायालयीन लढ्याला सुद्धा तयार राहिले पाहिजे. उदगीर व निलंगा मतदार संघाचे आमदार आणि जिल्ह्याचे खासदार यांना सोबत घेऊन आंदोलन उभे केले पाहिजे, जर ते आपल्या मागणी सोबत नसतील तर त्यांचा कडाडून विरोध केला पाहिजे.

चंद्रकांत टेंगटोल यांनी म्हटले की, आपले कॅबिनेट मंत्री बैठकीत असून जर हा निर्णय झाला असेल तर त्यांनी शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. काल माध्यमांना सांगितले उदगीर मध्ये गोवंश संशोधन केंद्राला जागा नाही, आज सांगतात एमआयडीसी साठी जागा आहे. दर दोन महिन्याला एकदा एमआयडीसी झाल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प मतदार संघा बाहेर जाताना स्वस्थ बसून आहेत. त्यांनी बैठकीत गोवंश संशोधन केंद्राचे महत्व पटवून दिले असते तर आपल्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. दुर्दैवाने आपल्याला राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे.

ओमकार गांजूरे यांनी आपले मनोगत मांडताना म्हटले की, एकमेकाच्या तोंडाकडे न पाहता, देवणीकरांनी एकदा आपले होणारे नुकसान पहावे, जर आज गप्प बसलात तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील. या प्रश्नाला आपल्या अस्मितेची जोड द्या, आंदोलन यशस्वी होईल.

विनोद मिंचे म्हणाले की, देवणी गोवंश आमच्या पूर्वजांचा वारसा आहे, हा वारसा एक राजकीय नेता पुसू शकत नाही. आई नंतर देवणी गाईच्या दुधाचे आमच्यावर ऋण आहेत, या दुधाचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत, या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी तन मन धनानी देवणीची जनता आपल्या नेत्यांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे, तेव्हा राजकीय नेत्यांना योग्य उत्तर द्यावे लागेल. संशोधन केंद्रासाठी जागा नाही, अंबाजोगाईला संशोधन केंद्र झाले तरी देवणी नावाने होणार आहे, असली कारणे सांगू नयेत. मातीची नाती राजकारण्यांची सोय पाहून तुटत नाहीत. देवणी गोवंशा सोबत आमचे दुधाचे नाते आहे.

बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हावगीराव पाटील म्हणाले की, देवणी येथे गोवंश संशोधन केंद्र झाले असते तर खूप मोठे रोजगाराचे केंद्र निर्माण झाले असते. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसाखाली सदरील निर्णय रद्द झाल्याचे लेखी कळविले होते, त्यानंतर मंत्रिमंडळाने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी आदेश जारी करून देवणीकरांचा भ्रमनिरास केला आहे. या निर्णयाविरुद्ध पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून उदगीर, देवणी व जळकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारने निर्णय रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेता कामा नये. निर्णयाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी, आता शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन केले.

बैठकीचे संयोजक पृथ्वीराज जिवणे पाटील म्हणाले की, देवणी गोवंश संशोधन केंद्र देवणीला झाले पाहिजे, जर हा निर्णय रद्द झाला नाही, तर लवकरच आमरण उपोषण, रस्ता रोको, बाजार बंद अशी आंदोलने केली जातील.

या बैठकीत रशीद मल्लेवाले, बालाजी वळसांगवीकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत मांडले. या बैठकीस नगरपंचायतचे उपाध्यक्ष अमित मानकरी, डॉ. संजय घोरपडे, अजित शिंदे, प्रा. अनिल इंगोले, बाबुराव लांडगे, जावेद तांबोळी, राजेंद्र चिद्रेवार, कपिल शेटकार, प्रा. रेवन मळभगे, नगरसेवक महादेव मळभगे, योगेश ढगे, नदीम मिर्झा, अमरदीप बोरे, सोमनाथ कलशेट्टी, श्रीमंत लूल्ले, गिरीधर गायकवाड, सोमनाथ लुल्ले, शरण लुल्ले, जाफर मोमीन, बंडेप्पा पडसलगे, संतोष मनसुरे, जिवणे शंकर यांच्यासह अनेक पक्ष पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.