पाच राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार? पाच राज्यांचे एक्झिट पोल? सविस्तर जाणून घ्या

Exit polls of five states

Exit polls of five states: विधानसभा निवडणूक 2023 साठी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाचही राज्यांसाठी निकालाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपला 36 ते 46 जागा मिळू शकतात. इतरांना एक ते पाच जागा मिळण्याचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत.

छत्तीसगड निवडणूक

‘जन की बात’ सर्वेक्षणात भाजपला 34 ते 45 जागा, काँग्रेसला 42 ते 53 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘चाणक्य’ सर्वेक्षणात भाजपला 33 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला 57 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. ‘सी व्होटर’च्या सर्वेक्षणात काँग्रेसला 41 ते 53 जागा, भाजपला 36 ते 48 आणि इतरांना चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य प्रदेश विधानसभा

230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यात जोरदार लढत झाली आहे. ‘जन की बात’ सर्वेक्षणानुसार भाजपला 100 ते 123 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 102 ते 105 जागा मिळू शकतात, तर इतरांना पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. ‘रिपब्लिक’ सर्वेक्षणानुसार भाजपला 118 ते 130, काँग्रेसला 97 ते 107 आणि इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. ‘पोलस्ट्रॉट’ सर्वेक्षणानुसार भाजपला 106 ते 116 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 111 ते 121 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मिझोराम विधानसभा

40 जागांच्या मिझोराम विधानसभेच्या ‘जन की बात’ सर्वेक्षणात, MNF ला 10 ते 14 जागा, ZPM 15 ते 25 जागा, काँग्रेसला पाच ते नऊ जागा आणि भाजपला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. तेलंगणा विधानसभा: 119 जागांच्या तेलंगणा विधानसभेसाठी. गुरुवारी ही निवडणूक पार पडली. ‘जन की बात’ सर्वेक्षणात काँग्रेसला 48 ते 64 जागा, बीआरएसला 40 ते 55 जागा, भाजपला 7 ते 13 जागा, एआयएमआयएमला 4 ते 7 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राजस्थान विधानसभा

१९९ जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपला १०० ते १२२ जागा मिळतील असा अंदाज ‘जन की बात’ सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला 62 ते 85 जागा मिळू शकतात. 14 ते 15 जागा इतरांना जातील असा अंदाज आहे. ‘पोलस्ट्रॉट’ सर्वेक्षणानुसार भाजपला 100 ते 110, काँग्रेसला 90 ते 100 आणि इतरांना 5 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ सर्वेक्षणात काँग्रेसला 86 ते 106 जागा, भाजपला 80 ते 100, इतरांना 9 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे.

निकाल रविवारी

पाच राज्यांमध्ये ७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदान झाले. पाचही विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी ३ डिसेंबरला जाहीर होतील. पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. तर तेलंगणात दोन्ही राजकीय पक्ष आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांच्यात तिरंगी लढत आहे. मिझो नॅशनल फ्रंट (MNF) हा मिझोराममधील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे.

सद्यस्थिती काय आहे?

समाजवादी पार्टी (SP), बहुजन समाज पार्टी (BSP), आम आदमी पार्टी (AAP), ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) यांसारख्या इतर राजकीय पक्षांनी या राज्यांतील निवडणुकीत भाग घेतला. सध्या राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. MNF चे झोरामथांगा हे मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत. तसेच बीआरएसचे के चंद्रशेखर राव तेलंगणात सत्तेवर आहेत.

सर्वांचा विजयाचा दावा

सर्वच पक्षांनी निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) ‘अभूतपूर्व यश’ मिळेल, असे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.