काँग्रेसला खिंडार; माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मंगळवारी करणार भाजपात प्रवेश

धाराशिव : गेल्या काही दिवसांत काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी खासदार मिलिंद देवरा, माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.

यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बसवराज पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. ते मंगळवारी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील मोठे राजकीय व्यक्तिमत्व असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू आहे. अखेर मंगळवारची वेळ निश्चित झाली आहे.

पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे.

दरम्यान, धाराशिव लोकसभेची जागा भाजपला सोडल्यास बसवराज पाटील हे उमेदवारीचे दावेदार होऊ शकतात. किंबहुना महाआघाडीचा जो उमेदवार असेल, त्याला त्यांची ताकद मिळू शकेल. मात्र त्यांनी कोणाकडेही अशी मागणी केली नसल्याचे पाटील यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.