अवकाळीच्या तडाख्याने उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या ‘वेदनांचा’ सरकारला विसर

अवकाळी पाउस

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्रात कहर केला असून राज्यातून ‘मायबाप’ सरकार कुठेतरी राजकारणात हरवले आहे. संकटात जनतेला आधार देण्यासाठी ‘सरकार’ असल्याने त्याला मायबाप म्हणतात, पण महाराष्ट्रात मात्र उलट चित्र आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस आणि पावसाळ्यातही न झालेल्या गारपिटीने महाराष्ट्रातील अनेक जिल्हे उध्वस्त झाले आहेत.

अनेक जिल्ह्यांतील शेतजमीन आणि पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार भागात हजारो हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील ‘गतिमान’ सरकार इतर राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त असून हजारो शेतकऱ्यांना चक्क वाऱ्यावर सोडले आहे अशा राज्यकर्त्यांना माझे ‘मायबाप’ कसे म्हणता येईल? अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतात उभ्या पिकांसोबत शेतकरी देखील उध्वस्त झाला आहे.

तीन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक अस्मानी संकटात उद्ध्वस्त झाले आहे. ज्वारीचे उभे पीकही आडवे झाले. नाशिक विभागात द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले. कांदा, टोमॅटो, केळी, पपईच्या बागा, ऊस, मका आणि नुकतेच काढलेले गव्हाचे पीकही अवकाळी पाउस आणि गारपीटीमुळे नष्ट झाले आहे. या खराब हवामानाने केवळ मराठवाडा आणि विदर्भातच नव्हे, तर कोकणापर्यंतच्या शेतजमिनीतही अस्मानी संकटाने हाहाःकार उडविला आहे. या पावसाने कांद्याबरोबरच इतर भाजीपाला, हरभरा, काढणी केलेल्या भाताचेही नुकसान झाले. दुष्काळ आणि गारपिटीच्या या वादळात राज्यातील 17 जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती बाधित झाल्याचे राज्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.

अर्थात ही केवळ प्राथमिक माहिती आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणखी तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू राहणार आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी निसर्गाचे काय घोडे मारले माहीत नाही, पण गेल्या काही वर्षांपासून निसर्ग शेतकर्‍यांच्या हाता तोंडातील घास नित नियमाने हिसकावून घेत आहे. पावसाळ्यात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आणि पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पाऊस आणि गारपीट असे दुहेरी संकट उभे ठाकले आहे.

या सततच्या आपत्तींचा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनावर खूप वाईट परिणाम होतो आहे. कर्ज काढून, अपार कष्ट करून घाम गाळून उगवलेले पीक व फळबागा डोळ्यांसमोर उध्वस्त होत असताना शेतकऱ्यांना किती वेदना होतात याची कल्पनाही करता येत नाही. सततच्या या संकटांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. कधी-कधी सुदैवाने निसर्गाने सहकार्य केले आणि चांगले उत्पादन झाले तर या शेतीमालाचे भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही, हे भयाण वास्तव आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे आश्वासन म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे. शेतकरी जेव्हा खऱ्या अर्थाने उत्पादन वाढवतो, तेव्हा त्याला काहीच उरणार नाही असे निर्णय सरकार घेते. सरकार आणि सरकारी पोपटपंची कायमची सुरु आहे. वांझोटे ‘मायबाप’ सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांवर काहीच बोलत नाहीत ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येत नाही. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देणे, शेतकर्‍यांना नैराश्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. जेव्हा शेतकरी आपला शेतमाल बाजारात नेतो, त्याला भाव परवडत नाही म्हणून फेकून देतो, तेव्हा सरकारचे कर्तव्य आहे, पुढे येऊन मदतीचा हात देण्याची, पण तसे होत नाही.

शेतकरी रस्त्यावर पिकवलेला शेतमाल फेकून देतो, तेव्हा सरकारचे बटिक माध्यम त्याला प्राईम टाईम देत नाही. एका ओळीत शेतकऱ्याची बातमी संपवून निवडणुकांच्या बातम्या दाखवू लागते, तेव्हा डोक्यात एक सणक जाते. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे दुर्दैव असे कि त्याला तलाठी ते गावठी सावकार सगळे नडत असतात, नागवत असतात. सरकार नावाची निगरगट्ट यंत्रणा शेतकऱ्याच्या नाही तर उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेते. तेव्हा शेतकऱ्यांपुढे जीव दिल्याशिवाय पर्याय उरत नाही, म्हणून जीव देत आहे.

अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस, किंवा जेव्हा पिके दुष्काळात करपली जातात. तेव्हा सरकार झोपी जाते. सतत कपटी कारस्थानं, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री आणि निवडणूक प्रचारात सरकारची शक्ती वापरली जात आहे. सरकारने कर्तव्यात कसूर केली म्हणून महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. शासनाच्या बेफिकीर उदासीनतेमुळे शेतकरी इतका हतबल झाला आहे की, अवयव विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकरी किडनी, यकृत, डोळे व इतर अवयव खरेदी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांना केली, ही सरकारच्या तोंडावर मारलेली सणसणीत चपराक आहे.

त्याच हिंगोली जिल्ह्यालाही आता खराब हवामानाचा फटका बसला आहे. या संकटामुळे अवयव विक्रीसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये, ही देवाकडे नाही तर सरकारकडे प्रार्थना करू या! राज्यातील तमाम शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तक्रारी करत असताना बोगस महासत्ता असलेले राज्याचे आणि केंद्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत? महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना, गतिमान सरकारचे मुख्यमंत्री या संकटात शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याऐवजी तेलंगणातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस हेही सतत प्रचारात मग्न आहेत, तर अजित पवार कधी डेंगू तर कधी रुसवे फुगवे करण्यात व्यस्त आहेत.

महाराष्ट्राचे ‘पालक’ असलेल्या शेतकऱ्याला अडचणीत असताना भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्र्यांनी आपला ‘मालक’ असलेल्या पक्षाचा प्रचार करीत आहेत. आई-वडिलांचा सांभाळ सोडून धन्याची सेवा करण्यात धन्यता मानणाऱ्या मुलांना काय म्हणावे? पांढरे कपडे घालून ते तेलंगणात प्रचार करत असताना, अवकाळी हवामानामुळे अडचणीत आलेले महाराष्ट्रातील शेतकरी मदतीसाठी त्यांच्याकडे पाहत आहेत, याचे भान देखील त्यांना नाही, त्यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?

‘रोम जळत असताना निरो सारंगी वाजवत होता’ अशी एक ऐतिहासिक म्हण आहे. फरक एवढाच की, महाराष्ट्र आणि शेतकरी जळत-मरत असताना ‘निरो’ सारंगी वाजवत बसला होता आणि महाराष्ट्रातील आधुनिक निरो निवडणुकीच्या प्रचारात मग्न असताना शेतकरी आपत्तींनी उद्ध्वस्त झाला आहे. राजा सुखी आणि जनता दु:खी, शेतकरी हतबल आणि सरकार बिनधास्त आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती.