उदगीर येथील शासकीय दूध डेअरी NDDB कडे सोपवा, सुधाकर शृंगारे यांची केंद्रीय मंत्री रुपाला यांच्याकडे मागणी

government milk dairy at Udgir Hand over to NDDB, Sudhakar Shringare

उदगीर : केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांची भेट घेऊन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी उदगीर येथील शासकीय दूध डेअरी व प्लांट पुनरुज्जीवित करण्याविषयी आज दि. 12 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे.

ही शासकीय दूध डेअरी व प्लांट NDDB कडे हस्तांतरित करून NDDB आणि केंद्र सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प पुनरुज्जीवित करून त्याचा विस्तार करण्याबाबत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत पुरुषोत्तमजी रुपाला यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

1978-79 मध्ये या प्रकल्पाची स्थापना झाली. सरासरी 1लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता असल्याने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तीन दूध प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प बंद असून तो पुनरुज्जीवित झाल्यास या भागात युवकांसाठी रोजगार निर्मिती होऊन शेतीसाठी जोडधंदा सुरू होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

सुधाकर शृंगारे

या प्रकल्पामुळे या भागाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होईल. वरील मागण्यांबाबत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तमजी रूपाला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

सुधाकर शृंगारे यांनी उदगीर येथील शासकीय दूध डेअरी व प्लांट पुनरुज्जीवित व्हावी म्हणून कायम पुढाकार घेऊन आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या सहकार्य आणि पुढाकाराने उदगीरची शासकीय दूध डेअरी पुनरुज्जीवित होणार आहे, त्यांच्या सहकार्याबद्दल पुनरुज्जीवन समितीचे निमंत्रक आशिष पाटील राजूरकर व सर्व सदस्यांनी आभार मानले आहेत.