राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचा पत्ता कट होणार? जे.पी.नड्डा आणि शहांनी घेतला निर्णय

amit Sahaha-jp nadda

मुंबई : राज्यात खराब कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जेपी नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबईला भेट देऊन खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईतही काही ठिकाणी बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजप सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. गणेशोत्सवानिमित्त गृहमंत्री अमित शहा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा मुंबई दौऱ्यावर होते.

यावेळी त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत लोकसभेच्या काही महत्त्वाच्या जागांवर चर्चा केली. मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी मुंबईतील भाजपच्या सर्व खासदार आणि आमदारांची बैठक झाली.

समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज आहे. त्यामुळे या खासदारांची तिकिटे कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी भाजप प्रत्येक खासदाराला त्यांची गेल्या पाच वर्षातील कामगिरी पाहूनच तिकीट देणार आहे. काही दिवसांत नावांवर चर्चा होऊन यादी जाहीर केली जाईल. त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.