पुण्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा, पैशांसाठी आपल्याच मैत्रिणीचे अपहरण आणि हत्या

Crime-News-murder

पुणे : मैत्रीच्या नात्याला तडा देणारी घटना पुण्यात घडली आहे. मैत्रीचा फायदा घेत पैशासाठी टोकाला जाऊन मैत्रिणीचा खून केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. लातूरहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या 22 वर्षीय तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, पैसे मिळाल्यानंतरही तरुणी घरी आपले नाव उघड करेल, या भीतीने या मित्रांनी तिची हत्या केली.

पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील शेतात मृतदेह पुरला. हत्येनंतर आरोपीने तरुणीच्या घरच्यांकडे मोबाईलवरून 9 लाखांची खंडणीही मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेची उकल करून या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केल्याची माहिती परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

भाग्यश्री सूर्यकांत सुडे (22, रा. विमानतळनगर, मूळ रा. हरंगुळ बुद्रुक, जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे यांना अटक केली आहे. मृत मुलीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय 49) यांनी 30 मार्च रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री ही मूळची लातूरची असून ती वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. ती 30 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉलमधून बेपत्ता झाली होती. दरम्यान, मुलीशी कोणताही संपर्क न झाल्याने तिच्या पालकांनी पुणे गाठून ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. याच काळात तिच्या पालकांच्या मोबाईलवर खंडणीचा मेसेजही आला होता. 9 लाख रुपये द्या नाहीतर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. शिवम हा मृत तरुणीचा मित्र आहे. झूम कार ॲपवरून त्यांनी कार भाड्याने घेतली होती. 30 मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण करून तिची हत्या केली होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील शेतात पुरला होता.

प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि लालसेपोटी आरोपींनी हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे. भाग्यश्रीचे अपहरण करून पैसे मिळू शकतात, असा विश्वास आरोपींना होता आणि त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले. तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पुणे करीत आहेत.