कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमुळे उदगीर तालुक्यातील शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होईल : मंत्री संजय बनसोडे

Kolhapur style dams will provide irrigation facilities to agriculture in Udgir taluka: Minister Sanjay Bansode

लातूर : उदगीर तालुक्यातील डोंगराळ भागातील शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि साठवण तलावाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे शेतीमधील उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होईल, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

उदगीर तालुक्यातील कासराळ येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. सर्व बंधाऱ्यांची कामे दर्जेदार आणि विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उदगीरचे उपविभागीय सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, महावितरणचे सायस दराडे, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस. गायकवाड, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, कासराळचे सरपंच दयासागर यल्लावाड यावेळी उपस्थित होते.

उदगीर, जळकोट तालुक्यात शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होण्यासाठी आतापर्यंत कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची 60 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. तसेच आणखी 142 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल. नवीन बंधारे बांधकाम, जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि साठवण तलाव अशा कामांचा यामध्ये समावेश आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यात कोल्हापूर पद्धतीचे 11 नवीन बंधारे बांधण्यात येणार आहेत. कासराळ येथे 3, सुमठाणा, वाघदरी आणि टाकळी येथे प्रत्यकी 2, कौळखेड आणि चांदेगाव येथे प्रत्येकी 1 बंधारा होणार आहे. तसेच आरसनाळ येथे 1 साठवण तलावाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी शासनाने 30 कोटी 68 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

त्यामुळे या परिसरातील सुमारे 450 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल असे ना. बनसोडे म्हणाले. तसेच आणखी 7 बंधाऱ्यांच्या कामांना 10 कोटी 69 लाख रुपये निधी मंजूर असून ही कामे निविदा प्रक्रियेत आहेत.

शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होईल; असे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्याम डावळे यांनी केले, गोपाळ पाटील यांनी आभार मानले.