Latur News | मतदारांच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

Organized various programs in latur district for awareness of voters

Latur News | लातूर जिल्ह्यातील नवमतदारांना तसेच ज्यांचे वय मतदार व्हायच्या टप्प्यात आहे, अशा युवक, युवतींना मतदानाचे महत्व कळावे, यासाठी पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत चुनावी पाठशाळा, वेगवेगळ्या जिंगल्स, मतदान जनजागृतीसाठी काव्यलेखन स्पर्धा असे उपक्रम घ्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘स्वीप’ संदर्भातील बैठकीत त्या बोलत होत्या.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 च्या अनुषंगाने स्वीप अंतर्गत जिल्हा कृती आराखडा घ्या निमित्ताने सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले आहे. तेथे मतदानाची टक्केवारी आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वाढेल यासाठी प्रयत्न करावे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महिला मतदार, नवतरुण मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभागी करून घ्यावे. यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून सर्व विभागाच्यावतीने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जिल्हा नगरपरिषद प्रशासन सहआयुक्त रामदास कोकरे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक एम.एस. पटेल, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नायब तहसिलदार (निवडणूक) पंकज मंदाडे, नायब तहसीलदार (करमणूक कर) परवीण पठाण नायब, वृशीप अर्थ फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक आकाश सोनकांबळे उपस्थित होते.