MP Election Survey | मध्य प्रदेशात मतदानापूर्वी राजकीय समीकरण बदलले? नवीन सर्वेक्षणात भाजप-काँग्रेस, कोण आघाडीवर? वाचा

Madhya Pradesh Opinion Poll 2023

Madhya Pradesh Opinion Poll 2023 : मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानंतर इतर सर्व राज्यांसह येथील निकाल 3 डिसेंबरला जाहीर होतील. ही लढत प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. या लढतीवर लोकसभेचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे साऱ्या देशाचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

गेल्या काही महिन्यांत अनेक टीव्ही चॅनेल्स आणि सर्वेक्षण संस्थांचे ओपिनियन पोल समोर आले आहेत, ज्यात बहुतांशी काँग्रेस सरकार स्थापन करताना दिसत आहे, परंतु निवडणुकीपूर्वी आलेल्या ताज्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स; जनमत चाचण्यांमध्ये भाजप बहुमताचा आकडा ओलांडत असल्याचे बोलले जात आहे.

मध्य प्रदेशातील एकूण 230 जागांपैकी भाजप 119 जागा जिंकू शकेल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे, म्हणजेच भाजप बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. 2018 मध्ये झालेल्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 109 जागा जिंकल्या होत्या.

काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर पक्षाला 107 जागा मिळण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या. सर्वेक्षणात चार जागा इतरांना जाणार आहेत. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर त्यातही भाजप आघाडीवर आहे. सर्वेक्षणानुसार भाजपला 46.33 टक्के मते मिळू शकतात, तर काँग्रेसला 43.24 टक्के मते मिळू शकतात. याशिवाय 10.43 टक्के मते इतरांना जाऊ शकतात.

2018 च्या मागील विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला 41.02 टक्के, काँग्रेसला 40.89 टक्के आणि इतरांना 18.09 टक्के मते मिळाली होती. यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन केले आणि कमलनाथ मुख्यमंत्री झाले. दरम्यान, मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपमध्ये सामील झाल्यानंतर कमलनाथ सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले.