राजकारणातील मुकद्दर का सिकंदर : संजय बनसोडे

Sanajay Bansode

पंचनामा | राजकारणात अनेक चमत्कार होत असतात. कधी कधी अपेक्षित नसताना संधी मिळते तर कधी संपूर्ण आयुष्य संपून जाते पण एक संधी भेटत नाही. काही जणांना दैव आणि वेळ अशी साथ देते कि एका नंतर एक संधी चढत्या क्रमाने भेटत जाते. या बाबतीत उदगीरचे आमदार संजय बनसोडे खऱ्या अर्थाने नशीबवान आहेत.

संजय बनसोडे यांनी स्वपक्षातील आणि विरोधी पक्षातील विरोधकांना एका टर्म मध्ये नामोहरम केले आहे. काँग्रेसचा देशमुख समर्थक गट सोडला तर एकही काँग्रेसनेता, कार्यकर्ता विरोधात नाही. काँग्रेसचे नेते आपापला वाटा घेऊन गप्प बसले आहेत. तर राष्ट्रवादीतील शरद पवार समर्थक गटातील काही नेते उघड तर काही लपून छपून सोयीस्कर भूमिका घेऊन आहेत. अजित पवार गटातील समर्थक तर आम्हीच मालक आहोत, म्हणून अभी नही तो कभी नही म्हणून झोडपून व वरपून खात आहेत.

भाजपातील नेत्यांना तर एकदम लॉटरी लागल्याचा फील येऊ लागला आहे. आधी विरोधक म्हणून लपून छपून सेटलमेंट करावी लागत होती, आता तर व्यासपीठावर येऊन ‘तुझे मेरी कसम’ म्हणून पोवाडे गावू लागले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घ्या, काम द्या, हिस्सा समान द्या असे सांगू लागले आहेत. संजय बनसोडे यांचे दैव एवढे ‘बलवत्तर’ कि सारे विरोधक एका पेक्षा एक ‘बदत्तर’ निघाले आहेत. संजय बनसोडे यांनी प्रत्येक नेत्यांचे आणि कार्यकर्त्याचे पूर्ण मोजमाप केले आहे. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार 5 लाख, 10 लाख, 25 लाख आणि कोटी किंमत ठरवून टाकली आहे. त्यामुळे सगळ्यांचा एकाएकी घसा बसलेला आहे. मतदार संघात काम निकृष्ट होऊ देत नाही तर काम न होऊ देत, एकजण आवाज काढत नाही.

संजय बनसोडे

मागील 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत वादामुळे दोन वेळा निवडून आलेले सुधाकर भालेराव यांना भाजपने उमेदवारी नाकारली, सुधाकर भालेरावांनी हाराकिरी करून भाजपाच्या उमेदवाराला मदत केली नाही. या संधीचे सोने संजय बनसोडे यांनी केले, भाजपला बालेकिल्ल्यात धूळ चारली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच निवडून येऊनही त्यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. अजित पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार मध्ये थेट राज्याचे क्रीडामंत्रीपद त्यांना मिळाले व बढती मिळाली. आता तर थेट परभणीचे पालकमंत्री झाले आहेत.

राजकारणात वाटचाल टप्प्याटप्प्याने असते, काही वळण अनपेक्षित येतात, काही संधी चालून येतात तर काही संधी हातात येऊन निसटून जातात. या बाबतीत संजय बनसोडे खरे नशीबवान आहेत, न मागता सर्व काही आपोआप मिळत आहे. अजित पवार महायुतीत आल्यानंतर सर्वात जास्त नुकसान लातुर भाजपाचे झाले आहे. लातूर जिल्ह्यात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे तिसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांचा मंत्रिपदावर दावा होता. लातुरात नेहमी प्रमाणे आपापसात भांडणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना दैवाने देखील हुलकावणी दिली आहे. राज्यातील बदलत्या राजकारणामुळे व मंत्री पदांची संख्याच कमी असल्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांना संधी मिळाली नाही. मंत्रीपद गेले आणि त्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे स्वप्न देखील भंगले.

नव्या राजकीय समीकरणात संजय बनसोडे हे जिल्ह्याचे मंत्री झाल्यामुळे व 15 ऑगस्ट व 17 सप्टेंबर दोन वेळा लातूरमध्ये झेंडा वंदनाची संधीही त्यांना मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. उदगीर परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांत चांगलीच खदखद होती. उदगीर भाजपाच्या नेत्यांना पक्ष नेत्यापुढे गळा काढून रडायची आणि चुगली करून एकमेकाचा काटा काढायची बेहतरीन सवय असल्याने सर्व भाजपा कार्यकर्ते रडत आणि उरबडवेपणा करीत संजय बनसोडे यांना पालकमंत्री करू नका म्हणून हमसू हमसून रडू लागले.

संजय बनसोडे

पालकमंत्री पदाची संधी संजय बनसोडे यांना दिली तर जिल्ह्याच्या राजकारणावर ते चांगलीच पकड बसवतील. कारण पालकमंत्र्यांकडे कोणाला निधी द्यायचा याचे अधिकार असतात. त्याचा बनसोडे लाभ उठवतील या भीतीपोटी भाजपच्या तिन्ही आमदारांनी व पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे या संबंधीचे रडगाणे मांडले आणि ते म्हणणे लक्षात घेऊनच संजय बनसोडे यांना लातूरचे पालकमंत्री पद मिळाले नाही. या सर्व घडामोडीतील दुसरी बाजू अशी कि लातूर काँग्रेसच्या नेत्यांना संजय बनसोडे पालकमंत्री म्हणून नको होते, त्यांनी यासाठी भाजपातील आपल्या समर्थकांना कामाला लावले, सगे सोयरे यासाठी वापरले याचीही चर्चा सुरु आहे.

उदगीर काँग्रेस मधील काही कार्यकर्ते तर आमच्या साहेबांच्या जावयाने खोडा घातला नाही तर संजय बनसोडे फिक्स लातूरचे पालकमंत्री होते असे मीठ मिरची लावून सांगत आहेत, आता यातील सिक्रेट काँग्रेस नेत्यांना माहित असेल. कारण लातूर काँग्रेस जवळ फक्त उदगीर कॉंग्रेसचे कार्यकर्ते जास्ती वावरत असतात. या धामधुमीत एकाच टर्म मध्ये आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि आता पालकमंत्री होण्याचे भाग्य लाभले हे कोणीही नाकारू शकत नाही. संजय बनसोडे यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला एकाच टर्म मध्ये मिळालेल्या संधीने काही जणांच्या पोटात दुखत असेल तर नक्कीच मोठे कारण आहे. सर्व बाजूचा विचार केला तर लातूरचे पालकमंत्री का झाले नाहीत, यामागे कोणतीही शक्यता नाकारता येत नाही.

सर्व घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय सोय म्हणून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊ केले. परभणीत भाजपची स्थिती फारशी बरी नसल्याने त्यांनीही परभणीसाठी होकार दिला. संजय बनसोडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले असल्यामुळे पालकमंत्री पदासाठी अडून बसले नाहीत, कारण लातूर जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून सन्मान मिळाला असता पण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना गोंजारत बसावे लागले असते. सर्वाच्या नाकदुऱ्या काढत बसावे लागले असते, त्यांना उलट दोन जिल्ह्यात जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची टीम जमा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना आपला काम करण्याचा वकूब एकाच टर्म मध्ये दोन जिल्ह्यात दाखविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे लातूरचे पालकमंत्री झाले नाहीत, हे खरे असले तरी दोन जिल्ह्यात विस्तार झाला, काम करण्याची संधी मिळाली, हे नक्की.

Read More 

पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?