राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजितदादांकडे राहील : धनंजय मुंडे

Dhananjay Munde

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पक्ष संविधानावर चालतो. आम्हाला नक्कीच जास्त गुण मिळतील आणि हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी (6 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घेतली. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लातूर जिल्ह्याचा दौरा केला. लातूर जिल्ह्यातील लोदगा येथे त्यांनी भेट दिली. बांबूपासून विविध उत्पादने तयार करण्यासाठी माजी आमदार पाशा पटेल यांच्या टिश्यू कल्चर आणि बांबू नर्सरी युनिटला भेट दिली.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी भाष्य केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजितदादांकडे राहील. कारण राष्ट्रवादीकडे सर्वाधिक आमदार आणि अधिकारी आहेत. त्यामुळे पेपर फोडण्याचा प्रश्नच येत नाही. परीक्षेत निश्चित गुण आहेत. पक्ष संविधानावर चालतो. त्यामुळे निश्चितच जास्त गुण मिळतील आणि हा पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम दिली जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. मान्य रकमेसाठी मंडळांना अधिसूचित केलेल्या काही जिल्ह्यांनी पीक विमा कंपनीने स्वीकारलेली नाही. पिक विमा कंपनीला शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. काहीही झाले तरी दिवाळीच्या आत अधिसूचित मंडळांना 25 टक्के आगाऊ रक्कम दिली जाईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सोयाबिन संशोधन केंद्र परळीत झाले कारण ..

सोयाबीन संशोधन केंद्राची मागणी लातूर जिल्ह्यातून आलेली नाही. परळी येथे सोयाबीन संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. बीड जिल्ह्यातील रेल्वे, अनेक कार्यालये लातूरला हलवण्यात आली. मात्र तेव्हा एकही बीडकराने त्यासाठी कोणतेही आंदोलन केले नाही. त्यामुळे तुम्ही देखील आंदोलन करू नका. यापेक्षा वेगळे आणि मोठे काही हवे असेल तर प्रस्ताव घेऊन या आम्ही नक्की सहकार्य करू, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.