पंचनामा : आगामी निवडणुकांत ‘इगो’ बाजूला सारून लढावे लागेल

Panchnama: In upcoming elections, ego will have to be put aside and fought

पंचनामा | I.N.D.I.A. आघाडीची तिसरी परिषद मुंबईत होणार असून, त्यात ‘ I.N.D.I.A.’ च्या लोगोचे अनावरण होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून त्यात 26 पक्षांचे प्रतिनिधी-नेते उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीत विविध पक्षांच्या 11 नेत्यांची एक समिती स्थापन केली जाईल आणि ती I.N.D.I.A. आघाडीचा अजेंडा ठरवेल.

या बैठकीच्या तयारीसाठी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नुकतीच बैठक झाली. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल मुंबईतील परिषदेला उपस्थित राहतील की नाही, याबाबत शंका होती; मात्र त्यांनी मुंबईला जात असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्लीत आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून वादाची ठिणगी पडली होती.  आगामी लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटप होत नसेल, तर विरोधी आघाडीचा काय फायदा? असा सवाल इंडियाचे घटक पक्ष एकमेकांना करीत आहेत. 16 ऑगस्ट रोजी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

त्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीत काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी आप नेत्या प्रियांका कक्कर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यापूर्वी दिल्ली सेवा अध्यादेशावरून आप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष झाल्याचे मानले जात होते. काँग्रेसने उशिराने अध्यादेशाला विरोध केल्यानंतर दोन्ही पक्षांमधील दरी कमी झाली.

त्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी आम्ही दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवू, अशी ओरड केली. त्यात भर म्हणून केजरीवाल यांनी छत्तीसगडमधील सरकारी शाळांची अवस्था अत्यंत वाईट असल्याची बोचरी टीका केली होती. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे.

त्यावर, तुम्हाला तुलना करायची असेल तर दिल्लीतील तुमच्या सरकारची शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारशी तुलना करा, असे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी चोख प्रत्युत्तर दिले. मुद्दा बरोबर आहे की, छत्तीसगडमधील बघेल सरकारच्या कामगिरीची, मग ती शिक्षण, आरोग्य आणि इतर क्षेत्रे, मागील भाजप सरकारशी तुलना करता येईल. कारण छत्तीसगड हे मागासलेले राज्य आहे, त्याची तुलना प्रगत असलेल्या दिल्लीशी करणे योग्य होणार नाही.

महाराष्ट्रात I.N.D.I.A. आघाडी किंवा महाविकास आघाडी या घटक पक्षांमध्ये संघर्ष नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली, जी ठाकरे गट किंवा काँग्रेसच्या पसंतीस उतरलेली नाही. या पक्षांनीही तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) चे संस्थापक नितीश कुमार यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आप तसेच दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी मतभेद संपवून लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी एकजूट निर्माण करावी, यासाठी नितीशकुमार यांनी संबंधित नेत्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. पाटण्याच्या पहिल्या सभेचे त्यांनी यशस्वी आयोजन केले; पण बंगळुरूच्या बैठकीत काही मुद्द्यांवरून नितीशकुमार नाराज होते आणि त्यामुळे त्यानंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेला ते उपस्थित राहिले नाहीत.

I.N.D.I.A. आघाडीचे निमंत्रणपद मिळविण्यात नितीशकुमार इच्छुक असल्याचे बोलले जात आहे; मात्र राष्ट्रीय जनता दलाचे म्हणजेच आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यांनी I.N.D.I.A. आघाडीचे प्रत्येक राज्यात वेगवेगळे संयोजक नसून एकच संयोजक असावेत, असे मत व्यक्त केले आहे. अर्थात एकापेक्षा जास्त राष्ट्रीय संयोजक असावेत, असे त्यांचे मत आहे.

रालोआमध्ये राज्यांमध्ये स्वतंत्र निमंत्रक होते. मात्र राष्ट्रीय स्तरावर एकच निमंत्रक होता. नितीशकुमारांना राष्ट्रीय निमंत्रकपद मिळू नये, अशी लालूंची इच्छा आहे की नाही, याची कल्पना नाही; पण जदयूला लालूंच्या या मतात रस नाही. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची सत्ता आहे. उद्या निमंत्रकपदावरून जेडीयू आणि आरजेडीमधील मतभेद तीव्र झाले तर त्याचा परिणाम तेथील सरकारवर होऊ शकतो आणि नितीशकुमार यांचे सरकार कधी कोसळते याची भाजपला प्रतीक्षा आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री आणि लालूंचे दीर्घकाळचे मित्र तेजस्वी यादव यांना आज ना उद्या बिहारचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. नितीश कुमार यांनी बुधवारी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाला भेट दिली. भाजपशी हातमिळवणी केलेल्या I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्याने अटलजींच्या स्मारकाला भेट द्यावी, अशीही अफवा पसरली होती, ते चुकीचे संकेत देत आहेत. नितीश कुमार यांनी म्हटले कि, वाजपेयी पंतप्रधान होतील असे भाकीत मी सर्वप्रथम केले होते.

रालोआची स्थापना 1999 मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाखाली झाली आणि मी त्यात सहभागी झालो, अशी नितीश कुमार यांनी पुस्ती जोडली आहे. नितीश कुमार यांना ‘पलटूराम’ म्हणून देखील संबोधले जाते. कधी ते भाजपशी खेळतात तर कधी लालूंशी, त्यांच्या राजकीय कोलांट उड्या कायम सुरु असतात. शरद पवार आणि नितीश कुमार त्यांना सोयीचे वाटेल तेव्हा बाजू बदलत असतात.

I.N.D.I.A. आघाडीत आपल्याला योग्य महत्त्व देण्यासाठी त्यांनी वाजपेयींच्या स्मारकाला भेट दिली असावी. पण लालूंच्या राजदप्रमाणे काँग्रेस त्यांच्या दबावाखाली येणार नाही. I.N.D.I.A. आघाडीचा निमंत्रक कोण असावा किंवा पंतप्रधानपदासाठी कोणाला उमेदवारी द्यावी हे आघाडीतील सर्व पक्षांना ठरवायचे आहे.

त्यामुळे सर्व घटक पक्ष एकमताने कोणता निर्णय घेतील,त्यावर ठाम राहतील याची खात्री सध्यातरी कोणी देऊ शकत नाही. जर असे घडले तर आगामी निवडणुकात इगो बाजूला सारून लढावे लागेल. जर इगो कुरवाळत बसले तर फक्त प्रयोग होईल पण प्रयोगाला यश येणार नाही. I.N.D.I.A. आघाडीत सध्या आलबेल दिसत आहे. हे किती दिवस टिकून राहते हे पाहावे लागेल.