पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?

Panchnama | Whose 'idea' is Amit Deshmukh vs Sanjay Bansode?

पंचनामा | लातूर जिल्ह्यात सध्या संजय बनसोडे विरुद्ध अमित देशमुख असे राजकीय संघर्षाचे चित्र निर्माण केले जात आहे. काही माध्यम आणि राजकीय नेते हिरीरीने भाग घेत आहेत. खरे तर संजय बनसोडे आणि अमित देशमुख यांची कोणत्याही परिस्थितीत तुलना होऊ शकत नाही. कारण अमित देशमुख यांच्याकडे वारसाने आलेले ‘राजकारण’ आहे. त्यांना कोणताही संघर्ष न करता सर्व काही आपोआप मिळालेले आहे. काहीही संघर्ष न करता आमदार व नामदार होता आले. यामागे त्यांच्या वडिलांची व काकांची पुण्याई होती. मागच्या चार दशकापासून त्यांच्याचं कुटुंबा भोवती जिल्ह्याचे राजकारण फिरत राहिले आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे राजकारण त्यांच्याचं कुटुंबाच्या हाती एकवटलेले आहे. अमित देशमुख यांचे राजकारण आणि राजकारणाची पद्धत ही सरंजामी पद्धतीची राहिलेली आहे. त्यांना राजकीय दृष्ट्या कोणताही संघर्ष करावा लागला नाही आणि यापुढेही करण्याची गरज भासणार नाही. त्यांना निवडणुकीपूरती काही दिवस पायपीट करावी लागते, त्यानंतर त्यांना काहीही करावे लागत नाही. सत्ता आली तर आपोआपचं मंत्रीपद मिळते. त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्के देईल असा विरोधक ठेवला नाही, जे विरोधक दिसतात ते लुटुपुटूची लढाई लढतात. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघापूरते ‘सुरक्षित वातावरण’ करून ठेवलेले आहे.

या उलट संजय बनसोडे यांना अतिशय संघर्षातून राजकीय यश मिळाले आहे. उदगीर-जळकोट सारख्या डोंगरी तालुक्यात त्यांनी पहिली निवडणूक हरल्या नंतरही सलग पाच वर्ष जनसंपर्क ठेवून कसलाही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कष्टाने राजकीय यश मिळविले आहे. लातूर ते उदगीर असा पाच वर्षात हजारो किलोमीटरचा प्रवास त्यांनी सलग पाच वर्ष केला आहे. पराभवाने ना उमेद न होता मतदार संघात कायम संपर्क ठेवून घराघरात आणि मनामनात स्वतःबद्दल हक्काची जागा उपलब्ध करून घेतली. संजय बनसोडे यांना मतदारांनी त्यांच्या जनसंपर्काकडे व मेहनतीकडे पाहून प्रेमाखातर मतदान केले. मतदान करताना पक्ष, चिन्ह व विशेषतः जातीकडे न पाहता केवळ ‘आपला माणूस’ म्हणून हक्काने मतदान केले. संजय बनसोडे निवडून आल्यानंतर बलवत्तर दैवाच्या जोरावर आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री एकाच टर्ममध्ये झाले.

आमदार संजय बनसोडे आणि आमदार अमित देशमुख यांच्यात ज्यांना कोणाला तुलना करायची आहे, या दोघांमध्ये राजकीय लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांना जाणीवपूर्वक संजय बनसोडे यांना अडचणीत आणायचे आहे. अमित देशमुख यांना स्वर्गीय विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांच्या मेहनतीने अतिशय सुरक्षित मतदारसंघ मिळालेला आहे. याउलट संजय बनसोडे यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून मतदार संघ निर्माण करावा लागला आहे. संजय बनसोडे राखीव मतदार संघातून निवडून आले आहेत आणि अमित देशमुख लातूर सारख्या सुरक्षित मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता ज्यांना अमित देशमुख आणि संजय बनसोडे यांच्यात थेट लढत व्हावी असे वाटत आहे.

त्यांना संजय बनसोडे यांचाचं कदाचित ‘काटा’ काढायचा असेल. लातूर जिल्ह्यातील ज्या जाणकार राजकीय विश्लेषकांनी आणि नेत्यांनी संजय बनसोडे यांच्यावतीने अमित देशमुख यांना थेट आव्हान दिले, त्यांनी वास्तवाकडे न पाहता फक्त दोघांनाही उचकावण्यासाठी राजकीय आव्हान दिले आहे. या राजकीय पंडितांच्या आणि विश्लेषकांच्या आव्हानांना स्वीकारून निवडणूक लढवायची असेल तर संजय बनसोडे यांना लातूर मतदार संघातून लढावे लागेल किंवा संजय बनसोडे यांच्या विरोधात अमित देशमुख यांना राखीव मतदार संघातून लढावे लागेल, जे शक्यचं नाही. फक्त एकच शक्यता उरते लातूर मतदार संघात अमित देशमुख व संजय बनसोडे यांच्यात लढत होऊ शकते. आता या दोन्ही शक्यता मध्ये सुवर्णमध्य या राजकीय पंडितांनाच काढावा लागेल. आपण भावनेच्या भरात काय बोलतोय, कदाचित याचे भान नसल्यामुळे बोलून गेले असतील पण याचे परिणाम संजय बनसोडे यांना भोगावे लागणार आहेत.

लातूरच्या राजकीय नेत्यांचा बोलघेवडेपणा संजय बनसोडे यांच्यासाठी अतिशय घातक आहे. जर नामदार संजय बनसोडे या राजकीय आव्हानाला हुरळून जाऊन मान डोलावून होकार देत असतील. मूक संमती देत असतील तर स्वतःच्या हाताने काटेरी पायवाट निवडत आहेत. या फेसबुक लाइव्ह फेम राजकीय विश्लेषकांच्या ‘लाईक आणि व्ह्यूज’ च्या नादी न लागता वास्तवादी विचाराने राजकीय मार्गक्रमण केले पाहिजे. आगामी निवडणुकांना एक वर्षाचा काळ असताना कोणतीही घाई गडबड न करता सरकारचा घटक म्हणून मतदार संघाची पुनर्बांधणी करणे आणि चौफेर विकास करणे हेच प्रामुख्याने ध्येय असले पाहिजे.

ज्या राजकीय नेत्यांनी अमित देशमुख यांना आव्हान दिले, त्या राजकीय नेत्यांनी अमित देशमुख यांच्या विरोधात लढावे. ते अधिक सोयीचे ठरणार आहे. कारण लातूर मतदार संघातील निडणुकांचे आणि देशमुखांचे बारकावे त्यांना चांगले माहीत आहेत. आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी किंवा वैयक्तिक आकसासाठी संजय बनसोडे यांच्यासारख्या नव्या दमाच्या नेत्याचा बळी देऊ नये. संजय बनसोडे यांच्या दैव आणि उज्ज्वल राजकीय भवितव्याचा कदाचित देशमुखांना अंदाज आला नसेल. त्यामुळे देशमुख बंधू अस्वस्थ असतील तर ते नैसर्गिक आहे. त्यांनी राजकीय शेरेबाजी  केली, भाषणातून टोमणे मारले तर त्यात नवल काय? ते नेहमीच शाब्दिक कोट्या करीत असतात. दिलीपराव देशमुख, अमित देशमुख व धीरज देशमुख यांनी उदगीरच्या सभेत कोपरखळी, धमकी, सूचना व अप्रत्यक्ष भविष्यातील राजकारणाचे समीकरण मांडले आहे.

त्यामुळे थेट संजय बनसोडे विरुद्ध अमित देशमुख असा टी-20 चा सामना आयोजित करणारे किती घाईत आहेत हे दिसून येते. कारण संजय बनसोडे यांच्या आजूबाजूला दिसणारी काही माणसं दिसत आहेत. जी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मागच्या काही दिवसांपासून थेट दिलीपराव देशमुख आणि कंपनीला आव्हान देत आहेत. सतत देशमुखांना खिजवत आहेत. ही माणसं कायम सोबत आहेत याचा एकच अर्थ होतो; संजय बनसोडे यांना देशमुखांना खिजवलेले आवडत असावे, नाहीतर परिणामांची काळजी नसावी. खरे तर ही संजय बनसोडे यांची राजकीय बेफिकिरी नसून स्वतःच्या उज्ज्वल भवितव्यासोबत खेळलेला जुगार आहे.

अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे यांच्यात संघर्ष व्हावा, ही मानसिकता व खेळी अतिशय धूर्त आणि घातकी आहे. संजय बनसोडे यांच्या आजूबाजूची दिसणारी सारी माणसं एकाच ध्येयाने वेडावली आहेत. काहीही करून देशमुख आणि बनसोडे यांच्यात संघर्ष व्हावा. दोघांना आमने सामने आणून उभे करावे. या लढाईत झाले तर नुकसान संजय बनसोडे यांचे होईल आणि जर योगायोगाने लढाई जिंकली आणि देशमुख हरले तर स्वतःचे कौतुक करून घेता येईल. स्व. विलासराव देशमुख यांच्या झालेल्या पराभवाच्या स्वप्नरंजनातून ही थोर मंडळी अजूनही बाहेर आलेली नाहीत. या राजकीय संघर्षाच्या आयडीयाचा जो कोणी ‘सूत्रधार’ असेल तो राजकीय ‘मुंगेरीलाल’ असण्याचीच दाट शक्यता आहे.

ज्यांनी संजय बनसोडे यांच्या मंचावरून देशमुखांना आव्हान दिले, त्या नेत्यांचीचं संजय बनसोडे यांनी जुनी भाषण जरूर ऐकावीत. या नेत्यांच्या भाषणाची सुरुवात लातूर जिल्ह्याचे वैभव, लातूर जिल्ह्याची शान, लातूर जिल्ह्याचे विकासरत्न, युवकांचे प्रेरणास्थान, राज्याचे भावी मुख्यमंत्री अशी 10 विशेषण लावल्या शिवाय पूर्ण होत नाही. भाषण करून सभा गाजविणे आणि निवडणुकीत लढून मैदान गाजविणे यात खूप अंतर आहे. संजय बनसोडे यांनी निवडणूक लढून मैदान गाजविले आहे. त्यामुळे ‘फेसबुक लाइव्ह’ फेम राजकीय विश्लेषकांपासून दूर राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात ज्याचा जोर त्यांचेचं ‘लाइव्ह’ करण्यात माहीर आहेत. एकदा भैय्या किंवा भाऊचा करिश्मा संपला कि एकदम गायब होतात.

संजय बनसोडे यांना फार मोठी आव्हान स्विकारून राजकीय शत्रुत्व वाढवून घेण्याची गरज नाही. कारण जेव्हा थेट लढाई सुरु होईल, तेव्हा यातील अर्धे सेनापती शत्रूच्या गोटात दिसतील, तेव्हा ‘हिट विकेट’ होऊ नका. तुमच्या राजकीय करिअरची ‘टेस्ट मैच’ आता तर सुरु झाली आहे, दमदार खेळी करून खूप मोठा स्कोअर उभा करायची गरज आहे. उगाच हाराकिरी करून त्याला स्वतःच्या हाताने टी-20 चा सामना करू नका. राज्याच्या राजकारणात खूप मोठी मजल मारायची असेल तर मित्रांना ‘आव्हान’ देऊ नका मैत्रीचे ‘आवाहन’ करा, ते जास्ती हिताचे आहे. देशमुख आणि बनसोडे हा संघर्ष ऐकायला आणि बघायला रोमांचक दिसत असला तरी खूप घातक आहे. या खेळापासून दोघांनी दूर राहण्याची गरज आहे. जर हा सामना रंगलाच तर लातूर जिल्ह्याचे राजकारण पुरते ढवळून काढणार आहे.

Read More

शिक्षणाचा बाजार कोणी मांडला? कसा मांडला? शिक्षण महागडे का झाले?