निष्क्रिय लोकप्रतिनिधी पुसून टाकत आहेत, देवणी आणि गोवंशाची ‘ओळख’

देवणी गोवंश फोटो

देवणी गोवंश जातींचे जतन व संवर्धन करण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. उदगीर आणि देवणी तालुक्यात जतन व संवर्धन केंद्र होईल अशी पशु पालकांची अपेक्षा होती. मात्र मराठवाडा मुक्ती दिनाच्या पूर्व संध्येला छत्रपती संभाजीनगर इथे झालेल्या बैठकीत देशी गोवंशीय जातींचे जतन व संवर्धन केंद्र, मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर देवणी येथील काही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करण्याऱ्या पक्ष व संघटनांनी निवदेन दिले, आणि या निर्णयाला विरोध केला. तेव्हा हा निर्णय रद्द झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी आंदोलकांना कळवून दि.3 ऑक्टोबरचे नियोजित आंदोलन मागे घ्यायला लावले. त्यानंतर काल दि. 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे देशी गोवंशीय देवणी गोवंश जातींचे जतन व संवर्धन मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे करण्याचा आदेश काढला आहे.

देवणी गोवंश राष्ट्रीय ओळख 

देवणी गोवंश ही फक्त एक प्रजाती नसून देवणी वळू आणि गोवंश देवणीची ओळख आणि अस्मिता आहे. सरकार मनमानी पद्धतीने देवणी गोवंशाची नाही तर देवणीची असणारी ओळख मिटवत आहे. देवणी जातीच्या गोवंशाने राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देवणीकराची मान उंचावण्याचे काम केले आहे. आज देवणीचे गोवंश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, त्याचे जतन व्हावे म्हणून तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील यांनी निधीची तरतूद केली, पण उदासीन राजकीय नेतृत्वाच्या अभावाने पाठपुरावा झाला नाही, केला गेला नाही.

देवणी गोवंश

देवणी गोवंश जपले पाहिजे, जगवले पाहिजे, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. एकदा पुसलेली ओळख पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. उदगीर आणि देवणी तालुक्यात सर्व सुविधा उपलब्ध असताना हातातील सत्तेचा उपयोग करून देवणी गोवंश आणि देवणीच्या पशु पालकांच्या भावनांना पायदळी तुडविले आहे. देवणीतील राजकीय नेतृत्व सतत विकासाच्या बाबतीत उदासीन रहात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून कोणताही विकास होऊ शकला नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे.

देवणी गोवंश इतिहास

देवणी गाय हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, उस्मानाबाद, परभणी सह कर्नाटकातील बिदर मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता 10-15 लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

देवणी गाय ही पाळीव जनावराची जात मुख्यतः कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात पाळले जाते. उत्तम दूध उत्पादन आणि शेताची नांगरणी यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवणी जातीला सध्या अस्तित्वात असलेल्या गुरांची दुहेरी हेतू असलेली जात मानली जाते. तेलंगणा, कर्नाटक व महाराष्ट्रातील शेजारचे जिल्हयामध्ये देखील ह्या गाईची मागणी आणि पोहोच वाढत आहे.

देवणीची सामान्य वैशिष्ट्ये म्हणजे, व्यापक आणि रुंद कान, गुळगुळीत आणि मऊ त्वचा. या देवणी जातीच्या गायी अतिशय संवेदनशील असतात. सामान्यतः देवणी गाई कमी दूध देतात पण कधीकधी दिवसाला दहा लिटर देखील देऊ शकतात. एवढी क्षमता ह्या जातीच्या गायीमध्ये दिसून येते. देवणी आज भारतीय जातींमध्ये सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जातींपैकी एक आहे.

निष्क्रिय लोकप्रतिनिधी 

देवणी गोवंश जपले पाहिजे, याबद्दल जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नाही. विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे बैठकीत असताना देवणी गोवंश जातींचे जतन व संवर्धन मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे करण्याचा निर्णय झाला. याबद्दल त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे देवणी व उदगीर तालुक्यातील जनतेने स्वागत केले पाहिजे, कारण त्यांना एकतर देवणी गोवंश आणि त्याचे महत्व माहित नाही; किंवा बैठकीत त्यांनी काहीही विरोध केला नाही.

देवणी गोवंश आदेश

देवणी गोवंश उदगीर किंवा देवणी तालुक्यात होणे किती महत्वाचे आहे, याचे महत्व त्यांना पटवून देता आले नाही, किंवा त्यांचे बैठकीत कोणी ऐकलेले नाही. खरे तर देवणी गोवंश आणि त्याची ओळख जपण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा त्यांच्याकडून होती, मात्र त्यांच्या उदासीनतेचे कारण कळायला मार्ग नाही.

दुसरी शक्यता आधीच निर्णय झाला असावा, फक्त औपचारिक घोषणा बैठकीत केली गेली. जेवढे दोषी विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आहेत; तेवढेच जबाबदार माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे हे सर्वजण जबाबदार आहेत. सोयाबीन केंद्र असो कि गोवंश संशोधन केंद्र असो एकही लोक प्रतिनिधी तोंड उघडायला तयार नाही. लातुरात उपोषण सुरु आहे, माध्यमात चर्चा सुरु आहे, पण एकही लोक प्रतिनिधी पुढे यायला तयार नाही. लोकप्रतिनिधी दबाव टाकत नाहीत. या मागील राजकारण आणि राजकीय स्वार्थ लोकांना कळून चुकला आहे.

जनआंदोलनाची गरज 

देवणी गोवंश संशोधन केंद्र देवणी किंवा उदगीर तालुक्यात व्हावे. यासाठी आता उदगीर, जळकोट व देवणी तालुक्यात मोठे जन आंदोलन उभारण्यात येणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्त्यांसोबत पशु पालक शेतकरी रस्त्यावर उतरून या निर्णयाला विरोध करणार आहेत. आगामी काळात विविध आंदोलनांच्या माध्यमातून मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध केला जाणार आहे. या विषयावर उदगीर, जळकोट व देवणी तालुक्यातील पशुपालक व शेतकरी लवकरच बैठक घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More 

देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता, देवणीकरांचा स्वप्नभंग