राहूल गांधी : ‘मोहब्बत कि दुकान’ चा ‘बहुरूपी’ मालक

राहुल गांधी

Rahul Gandhi |  स्वतंत्र भारतात सर्वाधिक सत्तेत नेहरू-गांधी घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यांचे सत्तेवरचे प्रेम जगजाहीर आहे. देशातील राजकारणात पणजोबा पंडित नेहरू, आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी असे 3 पंतप्रधान एकाच कुटुंबातील राहिलेले आहेत. त्यानंतर सोनिया गांधी यांनी सुपर पीएम बनून जवळपास 10 वर्ष देशात सत्ता राबविली. पण 2014 साली नरेंद्र मोदींच्या उदयाने भारतीय राजकारणाने असे वळण घेतले की, आता त्याच कुटुंबातील ‘तरुण’ राजकीय स्टंटबाजी करीत रोज एक नवा गेट अप करून फिरत आहे.

कारण राजकारणाच्या या अनाकलनीय वळणामुळे राहुल गांधी हे एक बहुरूपी असल्याचे वाटू लागले आहे. ज्यांचा जन्म होताच काँग्रेसने आपला भाग्यविधाता आल्याचे जाहीर केले होते. राहुल गांधी आपले पंतप्रधान व्हायला आले आहेत, हे ठरवून टाकले होते. देशाच्या सुदैवाने आणि कॉंग्रेसच्या दुर्दैवाने राहुल गांधी यांचा राज्याभिषेक होऊ शकला नाही. आता सत्तेच्या हव्यासापोटी राहुल गांधी रोज वेश बदलत आहेत, वेषांतर करून नवनवे बहुरूपी असल्याचे भासवत आहेत. कधी ते ‘कुली’ म्हणून डोक्यावर चाक असणारी ट्रॉली घेऊन फिरत आहेत, तर कधी पंक्चर काढत आहेत, आता ते कार्पेटर झाले आहेत.

खरे तर नव नवीन गेट अप करण्याऐवजी भारत जोडो यात्रेतून आलेल्या प्रगल्भणाचे दर्शन व्हायला हवे होते. या प्रदीर्घ यात्रेनंतर तयार झालेली प्रतिमा काँग्रेस साठी फायद्याची ठरली असती, पण सवयी प्रमाणे त्यांनी सर्व मेहनत पाण्यात घालत नवनवीन स्टंट करण्यात धन्यता मानली. त्यांच्या एवढा समृद्ध वारसा देशात कोणाकडे नाही. भारत जोडो नंतर स्वस्थ बसून पक्ष संघटनेकडे जरी लक्ष दिले असते, तरी चित्र खूप वेगळे राहिले असते. एवढा प्रवास केल्यानंतर सामान्य माणसाची भाषा आणि वेदना कळल्यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज होती. मोहब्बत कि दुकान, अदानी, अंबानी करता करता कुली, सुतारकाम करू लागले. पक्षातील जेष्ट नेते देखील या फॅन्सी ड्रेस मध्ये सामील होत टाळ्या पिटू लागले आहेत. हे अनाकलनीय आहे.

अलिकडच्या काही महिन्यांत ते सतत आपला वेश आणि भेस बदलत आहेत. कधी ट्रक ड्रायव्हर, कधी बाईक मेकॅनिक तर कधी स्वयंपाकी अशी विविध रूप धारण करीत आहेत. त्यांच्या या विदुषकी चाळ्यांना काँग्रेसी लोक प्रोत्साहन देत आहेत. काँग्रेस मधील जेष्ठ नेते त्यांना रोखत नाहीत, किंवा समजावत नाहीत का? हा प्रश्न देशाला पडला आहे. जर काँग्रेसी लोक त्यांना उद्युक्त करून विदुषकी चाळ्यांना प्रोत्साहन देत असतील, तर कॉंग्रेसच्या नेत्यांना उगाच मोठेपणा मिळाला आहे, असे वाटत आहे. जर राहुल गांधी समजावून देखील ऐकत नसतील तर काँग्रेसने आपले विधिलिखित मान्य केले आहे असेच म्हणावे लागेल. राहुल गांधी यांचा चपळपणा नाही तर धरसोडपणा 2019 सालीच दिसून आला होता. राहुल गांधी आपल्या पारंपारिक अमेठी मतदार संघातून चक्क पळून गेले आणि थेट उत्तरेकडून दक्षिणेत वायनाडला पोहोचले. आता वेषांतर करीत करीत 2024 मध्येराहुल गांधी नेमके कुठे पोहोचतील हे सांगणे काँग्रेसजनांनाही अशक्य वाटते.

राहुल यांना प्रत्येक वेळी नवे वेषांतर करून आपण ‘देशाचे आणि कॉंग्रेसचे’ भले करणार आहोत असे वाटत असले, तरी ते भाजपाचे हित करीत आहेत. भाजपचा नारा ‘काँग्रेसमुक्त भारत’ असला तरी काँग्रेसला 44 जागांवर नेण्यात सर्वात जास्त योगदान राहुल गांधी यांचेच राहिले आहे. दशकभरापूर्वी पर्यंतची परिस्थिती अशी होती की, काँग्रेसकडे मोठ्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत कार्यकर्त्यांची फौज होती. निवडणुका येताच कॉंग्रेसच्या सैन्याने झुंज देऊन आपला गड कायम राखला होता. निवडणुका लढल्या आणि जिंकल्या होत्या. हे कोणालाही नाकारता येणार नाही.

आता परिस्थिती अशी आहे की, सैन्य सोडा, काँग्रेसकडे स्वतःचा बालेकिल्लाही शिल्लक राहिलेला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात पक्षाचे नाव घेणारे लोक मिळणे कठीण झाले आहे. याचे सर्व श्रेय भाजपाचे खरे ‘स्टार प्रचारक’ राहुल गांधी यांनी दिले पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचे तर, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला दारुण पराभव आणि त्यानंतरच्या नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे काँग्रेसने आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावला आहे.

काँग्रेसच्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न झाला, तरी त्याचे श्रेय पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 53 वर्षीय तरुण चेहऱ्यालाच जाते. तो तरुण चेहरा ज्याला स्वत:ची दृष्टी नाही. स्वतःची रणनीती नाही. सतत भाजपकडून चूक होण्याची कोण वाट पाहत बसला आहे. जो जमिनीवर लढण्याऐवजी कलानेमी प्रमाणे सतत वेषांतर करण्यात व्यस्त आहे. त्यांना कायम वाटते की निवडणुका मतदानाने नाही तर ‘सोशल मीडिया’वर नव नवीन गेटअपमध्ये फोटो टाकून जिंकल्या जातात.

देशविरोधी वक्तव्यापासून ते अदानी-अंबानींच्या बडबडीपर्यंत, देशाच्या भूमीवर चीनने कब्जा केल्याच्या खोट्या कथेपर्यंत आणि लोकशाही आणि प्रसारमाध्यमांवरील हल्ल्यांपर्यंत एकही मुद्दा लावून धरला नाही. सतत एकच रडगाणे गाऊन विषयाची धार बोथट करून टाकली आहे. राहुल गांधीं म्हणजे मुद्दा आणि विषयाचे गांभीर्य नसलेला नेता अशी प्रतिमा बनली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही राहुल यांनी काँग्रेसच्या पराभवावर बोलण्यापेक्षा भाजपच्या पराभवावरच चर्चा करीत बसले, किंबहुना ते भाजपाच्या पराभवात आपला विजय शोधत असल्याचे दिसत आहे.

उदगीर, अहमदपूर भाजपमध्ये वाढली ‘अस्वस्थता’, माजी मंत्री विनायक पाटीलांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ होणार?

सत्तेचा लोभ कोणालाही कोणत्याही थराला नेऊ शकतो. आज राहुल गांधी हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबत आहेत किंवा राजकीय वेषांतरकार ‘बहुरूपी’ म्हणून आपली प्रतिमा आपल्याच हाताने करीत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवर कुली बनल्यानंतर, ते आता दिल्लीच्याच फर्निचर मार्केटमध्ये सुतारकाम करताना दिसत आहे. जर राहुल गांधी यांचे वेषांतर असेच पुढे जात राहिले तर तो दिवस दूर नाही, जेव्हा ते पंक्चरच्या दुकानातही दिसतील. हॉस्पिटल मध्ये डॉक्टर बनतील किंवा राजाबाबू मधील गोविंदा प्रमाणे ना ना वेशभूषेत करताना दिसतील.

असो, मोहनदास करमचंद गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. महात्मा गांधी म्हणाले होते की, काँग्रेसचा उद्देश पूर्ण झाला आहे, त्यामुळे आता त्याची गरज नाही. त्याचे विसर्जन केले पाहिजे पण नेहरूंनी गांधींचे ऐकले नाही. काँग्रेस त्यांनंतर 5 दशक सत्तेत राहिली. खरे तर महात्मा गांधीचे स्वप्न राहुल गांधी यांनाच पूर्ण करायचे आहे. कारण राहुल गांधी ज्या ‘क्रॉनिक स्पीड’मध्ये आहेत, त्यावरून महात्मा गांधी फक्त राहुल गांधी यांनाच कळले आहेत, त्यामुळे महात्मा गांधींची अपूर्ण इच्छा पूर्ण करूनच स्वस्थ बसतील असे दिसते आहे.

Read More 

पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?