राहुल नार्वेकर लोकसभा निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात प्रचाराला सुरुवात

Assembly Speaker Rahul Narvekar leaves for Delhi, 16 MLAs including Eknath Shinde will be disqualified

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पक्षाने राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत.

उच्चभ्रू, मध्यमवर्ग आणि झोपडपट्टी अशा तिन्ही प्रकारच्या मतदारांचा नार्वेकरांना अनुभव आहे. कोकणी आणि मराठी चेहरा असल्याने राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सध्या शिवसेनेचे ठाकरे खासदार अरविंद सावंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अरविंद सावंत यांच्या विरोधात आता नार्वेकर मैदानात उतरणार आहेत.

राहुल नार्वेकर यांनी फोडला प्रचाराचा नारळ

दरम्यान, राहुल नार्वेकर यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज प्रचाराची सुरुवात करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडणार आहेत.

नार्वेकर हे वरळी विधानसभेचा दोन दिवसीय प्रभागनिहाय दौरा करणार आहेत. ते आज सकाळी 11 वाजता वरळी येथील प्रभाग क्रमांक 193 ला भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11:40 वाजता प्रभाग क्रमांक 196 कार्यालयास भेट देणार आहे. नार्वेकर दुपारी 12.20 वाजता प्रभाग क्रमांक 195 ला भेट देतील. याशिवाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते प्रभागातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

दक्षिण मुंबईसाठी भाजपची खास रणनीती

दरम्यान, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मुंबईतील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी भाजपनेही अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे या लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघावर भाजपने विशेष भर दिला आहे. ठाकरे गटाची मते वळवण्यासाठी मराठीच्या मुद्द्यावर चालणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची बाजू भाजपने घेतल्यास नवल वाटायला नको. त्यातच भाजप-मनसे युतीची चर्चाही काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती.

मनसेसोबतची भागीदारी भाजपला मराठी मतांमध्ये रुपांतरीत करण्यास मदत करेल. माझगाव, शिवडी, लालबाग परळमध्ये मनसेची ताकद जामच्या बाजूने आहे. मराठी परिसरात बाळा नांदगावकर यांचा प्रभावही भाजपला मदत करू शकतो.