राज्यातील 23 भाजप खासदारांचा अहवाल पाकिटात बंद, आणखी कोणाला संधी मिळणार विनाअट; कोणाचा पत्ता होणार कट ?

राज्यातील 23 भाजप खासदारांचा अहवाल पाकिटात बंद, आणखी कोणाला संधी मिळणार विनाअट; कोणाचा पत्ता होणार कट ?

मुंबई | राज्यातील 23 भाजप खासदारांचा अहवाल पाकिटात बंद करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी त्यांची मते दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राज्यातील 23 खासदारांच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे.

त्यामुळे या बैठकीत आणखी कोणाला संधी दिली जाणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत निर्णय होणार आहे. राज्यात सध्या भाजपचे 23 खासदार आहेत. या सर्व खासदारांच्या कामाचा अहवाल तयार करण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. या निरीक्षकांनी आज दिवसभर आपले अहवाल तयार केले. हे अहवाल आता सीलबंद लिफाफ्यात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना पाठवले आहेत.

भाजपची आज राष्ट्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. हे अहवाल या बैठकीत मांडले जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा कोणाला संधी मिळते, हे या अहवालावरून स्पष्ट होईल. भाजपने प्रत्येक मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती करून खासदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केले आहेत.

लोकसभेच्या निरीक्षकांना संबंधित खासदारांच्या मतदारसंघात जाऊन माहिती गोळा करण्याचे आणि लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचे काम देण्यात आले होते. त्यानुसार या निरीक्षकांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनभावना समजून घेतल्या.

तसेच या निरीक्षकांकडून खासदारांच्या कामाबद्दल आणि त्याबाबत सर्वसामान्य नागरिकांचे काय म्हणणे आहे, तसेच या मतदारसंघातून विद्यमान खासदाराऐवजी आणखी कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी दोन नावे अहवालात देण्यात आली आहेत.

दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक

दरम्यान, भाजपने आज नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. भाजपच्या मुख्यालयात पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत लोकसभेच्या जागांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत देशातील २१ राज्यांतील जागांवर चर्चा होणार आहे. मात्र या २१ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, गुजरातसह 21 राज्यांतील जागांवर आज महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.