रोहित पवारांसह सगळेजण मंत्रीमंडळात जायला तयार होते : मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar-Chhagan Bhujbal

नाशिक : अजित पवार यांच्या गटात ब्लॅकमेल करणारी एकही व्यक्ती नाही. रोहित पवार अलीकडे मनाला येईल ते बोलत आहेत. खरे तर सर्वांनी मंत्रिमंडळात जायचे असे ठरवून रोहित पवारांनी पत्रावर सर्वात आधी सही केल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. विरोधी पक्षात असताना हे बोलायलाचं हवे, अन्यथा विरोधी आमदार म्हणून सिद्ध कसे होणार? प्रसिद्धी साठी रोहित पवार बोलत असल्याचे वक्तव्यही छगन भुजबळ यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार आणि अन्य आमदार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट आणि अजित पवार गट तयार झाला. त्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अजित गटनेते यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे चित्र आहे.

शरद पवार गटातील एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात सामील झाल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. काही नेत्यांचे ब्लॅकमेलिंग सुरू आहे, तुम्ही सही करा अन्यथा काम होणार नाही, असे सांगत ब्लॅकमेलिंग केले जात आहे,   असा आरोप रोहित पवार यांनी केला. त्यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांची दखल घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सर्वांच्या सह्या पत्रावर लावण्यात आल्याचे सांगितले.

तसेच, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षाकडून टीका सुरू आहे, ते त्यांचे काम करत आहेत. ते सगळे बोलतील, विरोधात असताना ते दुसरे काय करू शकतात? असे भुजबळ म्हणाले. पवार साहेबांनी कायदेशीर लढाई लढणार नाही, असे सांगितले आहे; असे भुजबळ राष्ट्रवादीच्या सुनावणीवर म्हणाले. पण नोटीस दिली जाते. बघूया काय होतंय? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

नाशिक कांदा प्रश्नावरून पुकारलेल्या संपाबाबत छगन भुजबळ म्हणाले की, कांदा व्यापाऱ्यांचे काही प्रश्न भारत सरकारशी तर काही मुद्दे राज्य सरकारशी संबंधित आहेत. लोकसभेच्या अधिवेशनात वाणिज्य मंत्री पियुष गोयल व्यस्त आहेत. सध्या कांद्याचा प्रश्न हा  अतिशय जिव्हाळ्याचा असल्याने या समस्येवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरु आहे. लवकरच काहीतरी निर्णय होईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

आमदार सुनील शेळके म्हणाले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधी आमदार रोहित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची जोरदार भूमिका घेतली होती. अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आता आमची सत्ता असल्याने अजितदादांची जागा घेण्याचा प्रयत्न रोहित पवार करत असल्याचा गौप्यस्फोट केला. अजितदादांची जागा कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही.

रोहित पवार यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी, स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करावे. रोहित पवार यांनी आपले विचार मांडले. रोहित पवार यांना वेळीच जागा मिळाली पाहिजे, रोहित पवार यांना अजित दादांची जागा घ्यायची आहे, म्हणून बोलत आहेत; असे वक्तव्य मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

आम्हाला माहित आहे की, काही आमदारांना तुम्ही सही करेपर्यंत आम्ही तुमचे काम करणार नाही, असे सांगून काम केले जात नाही. त्यामुळे नेत्यांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करून धमकावणे चुकीचे आहे. शेवटी, एखाद्या आमदाराला त्याच्या मतदारसंघातील विकास करण्सायाठी निधी हवा असतो. शेतकऱ्याचा प्रश्न असो, मजुरांचा प्रश्न असो किंवा तरुणांचा रखडलेला प्रश्न असो. काही नेते प्रामाणिकपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा तुम्ही सही करा, अन्यथा हे काम होणार नाही, अशी कोंडी केली जात आहे. आज कदाचित तुमच्या बाजूने आकडा दिसू शकतो, निवडणूक जवळ आल्यावर खरोखरच किती लोक सोबत आहेत ते कळेल, असे रोहित पवार म्हणाले.

Read More 

त्यानंतर रोहित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरला होता; आमदार सुनील शेळके यांचा गौप्यस्फोट