संजय बनसोडे परभणीचे पालकमंत्री, राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे होते, ते अजूनही प्रतीक्षेत आहेत.

उदगीरचे आमदार तथा क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागील अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित यादी जाहीर केली. त्यात संजय बनसोडे हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.

नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत. या जागेवर भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ दावा करत आहेत. मात्र, दोघांच्या या दाव्यात भुजबळ आणि महाजन यांचा दावा प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद

नाशिक, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकत्वाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून हे प्रकरण अद्याप सुटले नसल्याचे दिसून येते. या जिल्ह्यांच्या पालकत्वाबाबत मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री  

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचा घोळ काही सुटत नव्हता. स्वातंत्र्यदिनीही अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली होती. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबत पेच निर्माण झाला होता. आज अखेर हा पेच सुटला असून अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असतील, तर भाजपचे चंद्रकांत पाटील सोलापूरचे पालकमंत्री असतील.

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे  

पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे-पाटील
सोलापूर – चंद्रकांतदादा पाटील
अमरावती – चंद्रकांतदादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा – विजयकुमार गाव
बुलडाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदुरबार – अनिल भा. पाटील