शरद पवार यांचा मोठा दावा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठीच घेतल्या जात नाहीत?

sharad pawar

कोल्हापूर, 26 ऑगस्ट | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिड वर्ष झाला तरी झाल्या नाहीत. त्यामुळे विरोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या संस्था लोकांच्या प्रश्नांशी निगडित आहेत. सध्या भाजपाला पराभवाची भीती वाटत आहे, यासाठीच ते निवडणुका घेत नाहीत, निवडणुका न घेण्यामागे कोणतेही कारण नाही. या निवडणुकीत लोक त्यांना जागा दाखवतील, अशी भीती त्यांना सतावत आहे.

लोकांनी आपला राग मतपेटीतून दाखविला तर त्याचा लोकसभा निवडणुकांवर परिणाम होईल. याच भीतीपोटी निवडणूका टाळल्या जात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. मला महाराष्ट्रात बदल दिसत आहे. लोक दोन गोष्टींबद्दल नाराज आहेत. एक भाजप आणि दुसरा भाजप समर्थक. भाजपला पाठिंबा देणाऱ्या घटकांमध्ये देखील नाराजी आहे.

सध्याच्या राजकीय वातावरणामुळे राज्यातील शेतकरी आणि तरुण अस्वस्थ आहेत. शरद पवार म्हणाले की, राज्यातील जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड चीड आहे. याचा फटका आगामी निवडणुकात त्यांना बसणार आहे.

मोठा निर्णय : अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी? पुण्यातील राजकारण बदलणार?

1 तारखेनंतर जागा वाटपावर चर्चा

आम्ही जागा वाटपावर चर्चा करणार आहोत. जिथे सत्ता नाही किंवा शक्ती नाही तिथे आग्रह धरू नये, अशी सूचना करण्यात आली. त्यावर अंतिम निर्णय होईल. त्या निर्णयानंतर जागा वाटपाची बैठक होणार आहे. ती बैठक 1 नंतर होणार आहे. कोल्हापूर असो की चंद्रपूर याचा निर्णय बैठकीत होईल, असे शरद पवार म्हणाले.

मायावतींवर सक्ती करता येणार नाही

बसपा नेत्या मायावती INDIA आघाडीत का नाहीत? याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली. प्रत्येक पक्षाला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मायावती स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्या इतरांसोबत निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीत.

मायावती इतरांसोबत निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नसतील तर आम्ही त्यांना काहीही करायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी आमच्या सोबत न येण्याची भूमिका स्वीकारली असेल, तर आम्ही काय करणार? असा प्रति प्रश्न उपस्थित केला.

आम्ही राष्ट्रीय पातळीवर पाहतो. आंध्र आणि तेलंगणासोबत येत नाही. त्यांची भूमिका वेगळी आहे. ते आले नाहीत तर काहीही करू शकत नाहीत, त्याची कारणे शोधत बसण्यात काहीही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

भारत जोडो यात्रेचा फ़ायदा होईल

राहुल गांधी पुन्हा भारत जोडो यात्रा काढणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केले. राहुल गांधींची पहिली यात्रा यशस्वी झाली, त्याचे परिणाम कर्नाटक निवडणुकीत दिसून आले. पहिल्या यात्रे नंतर विरोधकांची स्थिती सुधारली. दुसऱ्या फेरीतही परिस्थिती सुधारेल, असे दिसते. लोकांना संघटित करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचा विरोधकांसाठी चांगला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.