शिवसेनेचे पथक आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार, शिवसेना नेते, विरोधी पक्षनेते घेणार आढावा

शिवसेना नेते, सचिव-खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या दोन-चार दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे पथक उद्या, बुधवार,29 नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहे. शिवसेनेच्या एका चमूचे नेतृत्व शिवसेना नेते सचिव-खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विविध भागांना भेटी देऊन नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण या विविध भागातील शेतकरी आणि बागायतदारांना दरवर्षी अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरकार भरपाई जाहीर करते, पण शेतकरी आणि बागायतदारांच्या हाती काहीच लागत नाही.

महाराष्ट्रात नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास उपटला आहे. कांदा, द्राक्ष, आंबा, पपई, डाळिंब, टोमॅटो, कापूस, तूर, हरभरा, गहू आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेनेचे पथक 29 नोव्हेंबर रोजी विविध भागात जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करणार आहे.

शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत हे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, डहाणू, पालघर या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत उपनेते नितीन बानुगडे-पाटील (अध्यक्ष शेतकरी सेना), नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर उपस्थित राहतील.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या ठिकाणी भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत उपनेते लक्ष्मण वडले (कार्याध्यक्ष शेतकरी सेना), वसीम देशमुख (मराठवाडा अध्यक्ष शेतकरी सेना) आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.