शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; ठाकरे गटाला नीट उत्तर द्यायची तंबी

MLA Disqualification-एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे

ShivSena MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आज उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली.

आजच्या उलटतपासणीत 21 जूनचा ठराव कधीच तयार नव्हता, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. या मुद्द्यावरून सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावेळी सुनील प्रभू यांनी मला आठवत नाही असे उत्तर दिले.

21 जूनचा ठराव तयार नव्हता

आज सुनावणी सुरू होताच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी 21 जून 2022 च्या ठरावावर बोलले. हा प्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आला. यावर बोलताना सुनील प्रभू म्हणाले की, त्याचवेळी ती’ प्रत अध्यक्षांकडं दिल्याचे सांगितले. यावर महेश जेठमलानी यांनी 21 जूनचा ठराव कधीच तयार केला नसल्याचा दावा केला. त्याचवेळी त्या ठरावाची मूळ प्रत विधानसभा अध्यक्षांकडे नसल्याचे सांगण्यात आले.

सतत प्रश्नांचा भडिमार

या ठरावाच्या मुद्द्यावरून महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर सातत्याने अनेक प्रश्नांचा भडीमार केला. त्याला सुनील प्रभू यांनी काही प्रश्नांची उत्तरे ‘हे खरे आहे, हे खरे नाही, मला माहीत नाही’ अशा पद्धतीने दिली.

तसेच यावेळी जोरदार युक्तिवाद करताना महेश जेठमलानी म्हणाले की, 31 ऑक्टोबर 2019 चा ठराव उद्धव ठाकरे यांनी पाठवला नसून तो शिवसेना विधीमंडळ कार्यालयाने पाठवला आहे.

आमच्या सुनावणीची तयारी करण्यासाठी

आजची सुनावणी सुरू असताना ‘ती’ ऐकण्यासाठी शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले उपस्थित होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून सुनील प्रभू यांची उलटतपासणी सुरू आहे. त्यानंतर आम्हालाही सुनावणीसाठी बोलावण्यात येईल.

त्यानिमित्त आजची सुनावणी ऐकण्यासाठी आलो आहोत आणि त्या पद्धतीने तयारी करू. तसेच विरोधकांची बाजूही विरोधक मांडतील. आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील, असेही गोगावले म्हणाले. आता पुढील सुनावणी बुधवार, 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता सुरू होईल.