शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; सुनावणीकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष

Rahul narvekar-udhav thakrey-eknath shinde

मुंबई | राज्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भात शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीला उशीर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले. यानंतर, एका आठवड्यात सुनावणी (MLA Disqualification Decision), दुसऱ्या आठवड्यात सुनावणीची रूपरेषा आणि दोन आठवड्यांनंतर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी कामकाजाला सुरुवात केली असून सोमवारी दुपारी सुनावणीला सुरुवात होणार आहे.

14 सप्टेंबर रोजी आमदार अपात्रता प्रकरणी पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणातील दुसरी सुनावणी आज होणार आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार आमदारांच्या अपात्रतेबाबत आठवडाभरात कार्यक्रम तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 54 आमदारांना नोटीस बजावली असून सोमवारी दुपारी सुनावणीला हजर राहण्यास सांगितले आहे. अपात्रतेबाबतच्या सर्व याचिका एकत्र करून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दोन्ही गट नेत्यांना बोलावले

शिवसेनेच्या दोन्ही गटांना कागदपत्रे एकमेकांच्या हाती देण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यानुसार या आठवड्यात नव्याने सुनावणी देण्यात आली. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आणि विधिमंडळाचा कायद्या नुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल. राहुल नार्वेकर यांनी घाईत निर्णय घेणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.

गरज भासल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावणीसाठी बोलावले जाऊ शकते, असेही नार्वेकर पुढे म्हणाले. शिवसेनेच्या दोन्ही गटातील 54 आमदारांची सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार दोन्ही गटांच्या आमदारांना सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.

आमदार अपात्रतेची सुनावणी लाईव्ह करा : विजय वडेट्टीवार

शिवसेनेच्या अपात्रतेबाबतची सुनावणी थेट घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाइन थेट प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्रातील जनतेसमोर व्हावी, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणात आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर प्रलंबित आहे. या सुनावणीकडे लोकशाही आणि न्यायप्रेमी महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. संवैधानिक संस्था, घटनात्मक पदे आणि एकूणच लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित राखण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read More

बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पार्थ पवार यांच्यात होणार लढत? राजकीय चर्चेला उधाण