उदगीर दुध डेअरी पुनरुज्जीवन प्रकरणात सुधाकर शृंगारे यांनी उदगीरकरांची मने जिंकली

खासदार सुधाकर शृंगारे

MP Sudhakar Shringare | लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी उदगीरकरांची मने जिंकली आहेत. काही लोकांनी त्यांची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब केली आहे. त्यांनी आपल्या मनातील खंत देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे लातुरात जाहीर सभेत बोलून देखील दाखविली आहे. त्यांच्या जागी दुसरा नेता असता तर भाषणात बड्या बड्या बाता करून आपल्या अडचणीना लपविले असते, त्यांनी तसे काही केले नाही. सुधाकर शृंगारे यांनी थेट मोकळेपणाने सांगूनचं टाकले कि काम करताना अडचणी आणल्या जातात, कोणाकडून अडचणी निर्माण केल्या जातात. लातूर भाजपात काड्याकुड्या केल्या, गटबाजी केली कि कामाचा नेता अशी धारणा झाली आहे.

खासदार सुधाकर शृंगारे यांनी मागील 4 वर्षात गटबाजीला अभय दिले नाही, गटबाजीत सामील झाले नाहीत, पक्ष आणि पक्षहित डोळ्यापुढे ठेवून काम केले. पक्षाचे धोरण आणि उपक्रम स्वतःच्या पैशाने राबविले. मोदी@9 कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले. कोणतीही कसर ठेवली नाही. लातूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सहकार्य करताना त्याचा गट पाहिला नाही, कोणत्याही कार्यक्रमाला उपक्रमाला सढळ मदत केली आहे.

उदगीर येथील शासकीय दुध डेअरी पुन्हा सुरु व्हावी म्हणून जेव्हा उदगीरातील काही युवकांनी पुढाकार घेतला तेव्हा सर्वात आधी खासदार सुधाकर शृंगारे पुढे आले. त्यांनी या समितीला खंबीर साथ दिली. समिती मध्ये माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, जिल्हाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्ष नाही. कोणताही नेता सोबत नाही. सर्व नवीन चेहरे आहेत, मला काय फायदा हा विचार केला नाही. उदगीरची दुध डेअरी सुरु झाली पाहिजे, शेतकरी व तरुणांना रोजगार देऊ शकणारी संस्था आहे. त्याचे पुनरुज्जीवन झाले पाहिजे ही भूमिका घेतली.

government milk dairy at Udgir Hand over to NDDB, Sudhakar Shringare

याउलट उदगीरचे लोकप्रतिनिधी ही डेअरी खाजगी संस्थेच्या घशात घालण्याचा डाव रचत होती. दुध डेअरीच्या जागेत बस स्थानक करावे, यासाठी प्रयत्न करीत होते. सतत काहीना काही तांत्रिक कारणांना पुढे करून डेअरीची जागा बळकावण्याचा प्रयत्न करीत होते. आजही जाहीरपणे समितीच्या पदाधिकाऱ्यांना डेअरीचे कुठ पर्यंत आले, काय म्हणते NDDB म्हणून टोमणे मारून बोलतात. खरे तर शहरातील 10-15 तरुणांनी त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरविल्याने मनातून बेचैन आहेत. कोणताही राजकीय वारसा नसणारी तरुण मंडळी एकत्र येतात, मुद्दा लावून धरतात आणि सातत्याने संघर्ष करतात, हेचं त्यांना अस्वस्थ करीत आहे.

उदगीरची शासकीय दुध डेअरी पुन्हा सुरु होईल, किंवा होणार नाही. परंतु उदगीरच्या समविचारी तरुणांनी केलेला संघर्ष खूप मोठा आहे. कोणाची मदत न घेता मागील 3 महिन्यापासून सतत संघर्ष करीत आहेत. सर्व संबंधित कार्यालयांना खेटे मारत आहेत. ज्यांची मदत घेता येते, त्यांना भेटत आहेत. जिथून माहिती घेता येते, तिथे जाऊन माहिती घेत आहेत, रोज स्वतःला आणि आंदोलनाला अपडेट करत आहेत. आज पर्यंत कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता आंदोलन पुढे पुढे नेत आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेला समाज माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, हे विशेष आहे.

या आंदोलनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्यांचे स्वीय सहायक उदगीरचे भूमिपुत्र अमोल बिराजदार कौळखेडकर यांचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. खासदार सुधाकर शृंगारे यांची भुमिका अतिशय निर्णायक राहिली आहे, त्यांनी काल उदगीरची दुध डेअरी  NDDB कडे सोपविण्याची केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला यांच्याकडे मागणी केली आहे. या चर्चेत दुध डेअरी, भौगोलिक परिस्थिती, उत्पादन आणि रोजगार याचे महत्व पटवून दिले आहे. खासदार शृंगारे यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री रुपाला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जर या दुध डेअरीचे पुनरुज्जीवन झाले तर त्याचे श्रेय समिती आणि खासदार सुधाकर शृंगारे यांचे राहणार आहे.

  • राजू मोगले, मुक्त पत्रकार