उदगीर, अहमदपूर भाजपमध्ये वाढली ‘अस्वस्थता’, माजी मंत्री विनायक पाटीलांची काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ होणार?

Udgir, Ahmadpur BJP Political Analysis

Political Analysis | अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत म्हणजेच राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर लातूर जिल्ह्यातील भाजपची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. सध्या कोण कोणत्या गटात आणि पक्षात आहे याचे कोडे कार्यकर्त्यांना पडलेले आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकारणात उदगीर आणि अहमदपूर मतदार संघातील भाजपाचे पारंपारिक दावेदार उघड्यावर पडले आहेत. उदगीर मधून माजी आमदार सुधाकर भालेराव आणि अहमदपूर मधून विनायकराव पाटील राजकीय कोंडीत सापडले आहेत. या दोघांची अवस्था ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी झाली आहे. पक्षनिष्ठा जपावी तर संधी मिळायची शक्यता नाही, पक्ष सोडावा तर कुठे जावे, याबद्दल दोघांच्या पुढे मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

कारण अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील व उदगीरचे आमदार संजय बनसोडे या दोघांनी अजित पवार यांना साथ दिल्याने या दोन्ही तालुक्यात भाजपाचा उमेदवार कायम राहील का? याच कारणावरून दोन्ही गटात अस्वस्थता वाढली आहे. क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यामुळे उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारीसाठी मोठी अडचण झाली असून ते सध्या तरी गप्प आहेत. कारण ही अडचण सुधाकर भालेराव यांनी हातांनी करून घेतली आहे. सध्या आतल्या आत ते धुमसत आहेत. त्यांना आपल्या भावना आणि मनातील सल व्यक्त करायला मार्ग सापडत नाही म्हणून गप्प बसून काळाची प्रतीक्षा करीत आहेत. सुधाकर भालेराव हे मौन किती दिवस पाळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण सुधाकर भालेराव यांचा स्वभाव पाहता, ते जास्त काळ कळ काढू शकतील असे वाटत नाही.

मात्र अहमदपूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने माजी मंत्री व भाजपचे नेते विनायक पाटील यांची मोठी गोची झाली असून ते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. विनायकराव पाटील सतत प्रयोग करीत असतात. यावेळी त्यांना वेगळा प्रयोग केल्यावाचून गत्यंतर नाही. भाजपा गैरसोयीची आणि काँग्रेस सोयीची वाटत असली आलटून पालटून प्रयोग करण्याचे दिवस संपले आहेत. याच प्रयोगातून माजी आमदार विनायक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमधील इच्छुक मंडळी नाराज झाली होती.

त्यावेळी पक्षश्रेष्ठींकडे विनायक पाटील सोडून कोणालाही विधानसभेची उमेदवारी द्या, सर्वजण आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असे सांगितले होते. मात्र, पक्षश्रेष्ठीनी विनायक पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर अहमदपूरमधील दिलीप देशमुख व अयोध्या केंद्रे या दोघांनी बंडखोरी केली. परिणामी विनायक पाटील यांचा पराभव झाला व राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील आमदार झाले. त्यानंतर पक्षातील गटबाजी मोडून काढण्यासाठी अयोध्या केंद्रे व दिलीप देशमुख या दोघांनाही पुन्हा भाजपत प्रवेश देण्यात आला. तर दिलीप देशमुख यांना तर भाजपने आता ग्रामीण जिल्हाध्यक्ष केले आहे. अलीकडे भाजपात बंडखोरी केली, पक्षाला नुकसान पोहचवले कि पदे मिळतात, पक्ष नेतृत्व बक्षीस देते हे अनेक उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.

आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवारांसोबत असल्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे माजी आमदार विनायक पाटील यांची अस्वस्थता कमालीची वाढली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत कोणता पक्ष निवडायचा, याचा विचार ते करीत आहेत. मागील 5 वर्षात भाजपातील गटबाजीचे नेतृत्व विनायक पाटील आणि सुधाकर भालेराव यांनी अतिशय हिरीरीने केले पण आता त्यांच्या पुढेच अस्तित्वाची लढाई लढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विनायकराव पाटील भाजपाला जय श्रीराम करतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. याउलट सुधाकर भालेराव घाई गडबडीत निर्णय घेणार नाहीत. श्रद्धा आणि सबुरीने निर्णय घेतील एवढे नक्की!

कारण उदगीर तालुकाध्यक्ष निवडीत सर्व प्रतिष्ठा पणाला लाऊन आपल्या मर्जीचा तालुकाध्यक्ष केला. त्यासाठी जवळपास दोन महिने पक्ष नेत्यांकडे तगादा लावला होता. पूर्ण ताकत लावून गोविंद केंद्रे आणि राहुल केंद्रे यांच्यासह पक्षांतर्गत सर्व विरोधकांना बाजूला सारून आपल्याच मर्जीचा तालुकाध्यक्ष केला. सुधाकर भालेराव यांच्या राजकीय हट्टाचे फायदे तोटे येणाऱ्या काळात दिसून येतील पण सुधाकर भालेराव यांच्या विरोधात उतरलेल्या गटाने चमडी आणि दमडी बचाव धोरण अवलंबून विरोधाचे तुणतुणे वाजविले पण विरोध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. आपल्या फायद्याचे आणि सोयीचे नाव निवडण्यात वेळ वाया घालवत बसले, पण ठाम निर्णय शेवट पर्यंत घेऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांवर कुरघोडी करण्यात सुधाकर भालेराव यशस्वी झाले.

आता यापुढील काळात भाजपा पुढील आव्हाने कठीण होणार आहेत. भाजपातील काही नेते उघडपणे संजय बनसोडे यांच्याशी साटेलोटे करून सोयीस्कर राजकारण करीत आहेत, तर काही जण पडद्याआडून सेटलमेंट करीत आहेत. भाजपाला आपले अस्तित्व जोपासायचे असेल तर सुधाकर भालेराव यांना वगळून पुढे जाता येणार नाही. सुधाकर भालेराव यांना पुढे जायचे असेल तर काही लोकांना नाईलाजाने सोबत घ्यावे लागेल. हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बदलत्या समीकरणाला जुळवून घेतले पाहिजे. याउलट ज्यांना सुधाकर भालेराव यांना विरोध करायचा आहे, त्या गोविंद केंद्रे आणि तत्सम नेत्यांनी स्वतः थेट विरोध करावा. कार्यकर्त्यांचा बळी देऊन विरोध करायचे आणि राजकारण करायचे डाव मागच्या 15 दिवसातील घडामोडीत उघड झाले आहेत. सुधाकर भालेराव आणि गोविंद केंद्रे गटात होणारी रस्सीखेच कार्यकर्त्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. बाकीचे गटात तटात विभागलेले नेते सोय पाहून सोयरिक जमविण्यात तरबेज आहेत. त्यामुळे नेत्यांची लुटुपुटूची लढाई आणि सेटलमेंट कार्यकर्त्यांना कळून चुकली आहे.

Read More

पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?