Udgir News : उदगीरला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर, ना. बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश

Udgir News

उदगीर : मागील अनेक वर्षापासून उदगीरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याची मागणी होती. शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांची वाढती लोकसंख्या पाहता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नितांत गरज होती. मागील काळात विविध आमदारांनी मागणी केली पण यश आले नव्हते. अखेर काल दि.15 मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याची घोषणा झाली.

उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन व्हावे यासाठी ना.संजय बनसोडे यांनी सतत पाठपुरावा केला, मागणी रेटून लावली होती. विकास कामांसोबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन झाल्याने सर्वत्र ना.बनसोडे यांचे अभिनंदन केले जात आहे.

त्यानुसार, येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचा नोंदणी क्रमांक MH55 असलेले नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (उप RTO) कार्यालय मंजूर करण्यात आले आहे आणि त्याची अधिसूचना राज्य सरकारच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि. 15) जारी केली आहे. नवीन पदे निर्माण होईपर्यंत समायोजन करून पदे भरण्याची सूचना आहे.

डेप्युटी आरटीओ, एआरटीओ, मोटार वाहन निरीक्षक, सहा दुय्यम मोटार वाहन निरीक्षक, लिपिक आणि कॉन्स्टेबल ही पदे शेजारच्या कार्यालयातून घेतली जाणार आहेत. क्षेत्रीय अधिकारी लातूर यांच्या कार्यालयातून पदांचे समायोजन होण्याची शक्यता आहे. उदगीर येथे आरटीओ कार्यालय सुरू करावे, अशी मागणी मोटार वाहन मालक, चालक यांनी केली होती. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी या कार्यालयाला तातडीने मान्यता दिल्याने सर्व स्तरातून आभार व्यक्त केले जात आहेत.

MH55 ही उदगीरची नवीन ओळख

उदगीरसाठी MH55 चा नवीन नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. त्याशिवाय इंटरसेप्टर वाहनालाही मंजुरी देण्यात आली आहे. कार्यालयाचा खर्च व इतर खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात केली जाईल. गृह विभागाचे अवर सचिव भरत लांघी यांनी यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे.