उदगीर तालुका क्रीडा संकुलासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर : मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

Udgir Taluka Sports Complex Sanjay Bansode sanctioned Rs 4 crore fund
उदगीर : उदगीर मतदार संघात क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी या भागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे अथक परिश्रम घेत आहेत. क्रीडा खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर खेळाडुंना भरीव मदत करुन त्यांच्यामध्ये खेळाची संस्कृती रुजावी यासाठी ते नेहमीच खेळाडुंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत.
उदगीरसह ग्रामीण भागातील खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी उदगीर व जळकोट शहरात तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यासाठी ते मागील काळापासून प्रयत्नशील असुन पुणे येथील बालेवाडीच्या धर्तीवर उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यासाठी त्यांनी भरीव निधीची तरतुद करुन तालुका क्रीडा संकुलचे काम युध्द पातळीवर सुरु करण्याचे त्यांनी सुचना दिल्या आहेत.
राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत उदगीर शहरातील क्रीडा संकुलाबाबत निधीच्या तरतुदीसाठी विचार करण्यात आला होता. उदगीर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आता भव्य दिव्य व अत्याधुनिक सुविधेसह तालुका क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी 4 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर तालुक्यातील विविध खेळाडुंना आता या तालुका क्रीडा संकुलाच्या माध्यामतुन राज्य व देशपातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध होणार असुन आपल्या भागातुन जास्तीत जास्त क्रीडापटू तयार होवून आपल्या नेत्रदीपक कामगिरीने आपल्या गावाचे, शहराचे आणि आपल्या राज्याचे नाव देशपातळीवर करतील अशी अपेक्षा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
सदर निधी मंजूर केल्याबद्दल ना.संजय बनसोडे यांचे खेळाडु, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमी नागरीकांनी अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.