पंतप्रधानांचा रोड शो व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत : क्रीडा मंत्री संजय बनसोडे

Sports Minister Sanjay Bansode

नाशिक : नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. असाच युवा कुंभमेळा 12 ते 16 जानेवारी या कालावधीत नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर होणारा युवा महोत्सव हा भव्य दिव्य आणि न भूतो न भविष्यती होणार असल्याचा विश्वास राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

■ नाशिक निवडण्याचे कारण काय ?

गेल्या वर्षी कर्नाटकात हा महोत्सव झाला होता. यंदा हा महोत्सव महाराष्ट्रात व्हावा, अशी विनंती राज्यातील सर्व नेत्यांनी पंतप्रधानांना केली आहे. त्यानुसार हा महोत्सव राज्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला हा महोत्सव नागपुरात घेण्याचा मानस होता; नंतर पुणेकरांनीही त्यावर दावा केला.

मात्र, यंदा 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे अनावरण होणार असून, त्या पार्श्वभूमीवर हा युवा महोत्सव नाशिकमध्येच घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी दरम्यान होत असून या महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही.

हा महोत्सव यशस्वी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे हा महोत्सव तरुणांसाठी एक वेगळा उत्सव ठरणार आहे.

देशातील किती राज्यांमधून किती लोक येणे अपेक्षित आहे? उत्सवादरम्यान प्रत्येक 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशशंभर तरुणांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन स्वयंसेवक असे सुमारे आठ हजार जण सहभागी होणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ हजर रहाणार आहे. केंद्रातील काही मंत्री हजर राहण्याची शक्यता आहे.

■ आयोजनासाठी समित्यांची स्थापना

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे असे तीन मंत्री या सर्व कामांवर देखरेख ठेवणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, याशिवाय गृह, वित्त, महसूल, कृषी उच्च व शिक्षण, सांस्कितक व पर्यटन, शालेय शिक्षण या सर्व विभागांना या महोत्सवात सहभागी करून घेतले जाणार आहे.

■ महोत्सवात नाशिककरांना काय पहायला मिळेल ?

महोत्सव नाशिकसह महाराष्ट्रासाठी वेगळे काही तरी देऊन जाईल, यात शंका नाही. महोत्सवात 28 राज्ये सहभागी होत आहेत. या राज्याच्या लोककला तसेच सांस्कृतिक परंपरा, सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यात समूह लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.

एकाच ठिकाणी याचे सादरीकरण होऊ नये यासाठी शहरातील कालिदास कलामंदिर, उदोजी मराठा वसतिगृह, रावसाहेब थोरात सभागृह अशी महत्त्वाची ठिकाणे निवडण्यात आली आहे. सर्व विभागातील नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. चारही दिवसांचे नियोजन करण्यात येत आहे.

■ पंतप्रधानांचा रोड शो होणार का?

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच नाशिकला येत आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी ते तपोवनातील याच मैदानावर निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आले होते. त्यामुळे हे मैदान पुन्हा तीच गर्दी अनुभवेल, यात शंका नाही. ही भूमी साधू-महंतांची आहे. ज्याप्रमाणे सिंहस्थ भरतो, त्याप्रमाणे हा युवकांचा कुंभमेळा या ठिकाणी होणार आहे.

नाशिक मध्ये या निमित्ताने पंतप्रधानांचा रोड शो व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच मुख्य कार्यक्रमाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. चार दिवसांचे कार्यक्रम पूर्ण झाले आहेत. या युवा महोत्सवात कोणतीही कसर राहणार नाही. हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि नाशिककरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे असेल याची ग्वाही देतो, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या वतीने या महोत्सवातून देशातील युवकांना नवीन दिशा या मिळेल असा विश्वास देखील मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.