विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे का नको आणि विश्वजीत गायकवाड का हवे? याचे उत्तर नेत्यांनाच द्यावे लागेल?

BJP लातूर

निवडणूक | लोकसभा निवडणुका जाहीर व्हायला आठ दहा दिवस उरलेले असताना आणि राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण वातावरण भाजपसाठी अनुकूल असताना येथील स्थानिक नेते मात्र नेहमीप्रमाणे पैशाच्या मागे लागलेले दिसून येत आहेत. स्थानिक नेत्यांची पैसा ही कायमची कमजोरी राहिली आहे. निवडणूक कोणतीही असो उमेदवारांची पात्रता, काम, ओळख पाहण्याआधी ‘आहेर’ किती करू शकतो याचा आधी विचार करतात.

देशभर भाजपसाठी ‘राम’ हा आस्थेचा विषय असला तरी लातुरच्या भाजप नेत्यांसाठी ‘लक्ष्मी दर्शन’ हा श्रद्धेचा नाही तर जिवाभावाचा विषय राहिलेला आहे. या सर्व प्रकाराला स्थानिक नेते सवडीनुसार तत्वाचा मुलामा देऊन प्रदेश पातळीवरून समर्थन असल्याचे भासवत असतात. स्थानिक नेत्यांनी जिल्हाभर फक्त बाहेरून उमेदवार आणून घरावर सोन्याची कौल घालून घेतल्याची उघड चर्चा कायम राहिलेली आहे. आता देखील लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उघड ‘देवाण-घेवाण’ होत असल्याची चर्चा भलतीच रंगात आली आहे.  

एकीकडे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पक्षातून समर्थन मिळत असले तरी स्थानिक नेते ‘लक्ष्मी दर्शनाची’ सोय झाली नसल्याने सुधाकर शृंगारे यांच्या नावाला विरोध करू लागले आहेत. आता सुधाकर शृंगारे स्थानिक नेत्यांना चांगलेच ओळखून असल्याने हात आखडता घेऊन वरूनच काही तरी जादू करण्याच्या मूड मध्ये आहेत. तेव्हा आता देवाण-घेवाण होणे शक्य नसल्याचे दिसू लागल्यावर विरोधी सूर लावला आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील सुधाकर शृंगारे यांचे नाव घेतल्याची विश्वसनीय माहिती बाहेर आल्याने ‘स्थानिक डीलर आणि लीडर’ बेचैन झाले आहेत. परवा लातूरला निरीक्षक म्हणून आलेल्या मंत्री अतुल सावे यांच्या समोर बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी सुधाकर शृंगारे यांना पसंती असल्याचे सांगितले.

याउलट या बैठकीत ‘विश्वजीत गायकवाड यांचे नाव घ्या’ असा आदेश देण्यात आल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी उघड सांगितले आहे. फक्त निलंगा विधानसभा मतदारसंघातील कांही पदाधिकारी वगळता सर्वांनी सुधाकर शृंगारे यांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. सदैव पैशावर डोळा ठेवून राजकारण केल्याने सारे राजकारणच गोत्यात आले तरी पैशाचा मोह काही सुटत नाही, अशी प्रतिक्रिया काही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. फक्त ‘पैसा’ मिळत नाही म्हणून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना संपविण्याचा कुटील डाव स्थानिक भाजप नेत्यांकडून केला जात असल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक नेते खाजगीत बोलत आहेत, या सर्व प्रकाराबद्दल उघड नाराजी व्यक्त करत आहेत, पण हा आवाज अतिशय क्षीण आहे.

दर पाच वर्षाला राजकीय दुकानदारी मांडायची आणि उमेदवारी विकून कोट्यावधी रुपयांची कमाई करायची हे नेहमीचे चित्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना बेचैन करीत आहे. ही राजकीय दुकानदारी पक्ष आणि कार्यकर्ते यांच्यासाठी घातक खेळ असला तरी पक्ष याचं ‘स्थानिक’ नेत्यांना कायम बळ देत असल्याने ही दुकानदारी कधी बंद होणार की; कायम अशीच तिकीट वाटपा आडून लुटालूट कायम सुरु राहणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

‘पार्टी विथ डिफरन्स’ हा नारा फक्त पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या बैठकीत वापरला जातो. बाकी तिकिटांची खरेदी विक्री करणारे स्थानिक नेते, पडद्याआडून राजकीय तडजोडी करणाऱ्या नेत्यांनी कायम पक्ष आणि निष्ठा याच्यात कायमच ‘डिफरन्स’ ठेवला आहे. सतत काँग्रेस नेत्यांच्या सूचनेवरून जिल्ह्याचे राजकारण सुरु असल्याचे बोलले जाते. त्याला प्रदेश स्तरावरील काही नेते सामील असल्याचे देखील बोलते जाते. तसे नसते तर काँग्रेसच्या सोयीचे आणि पक्षातील नेत्यांकडून पैशासाठी केले जात असलेले ‘राजकारण’ चालले नसते, असा काहींचा सूर आहे.

या सर्व घडामोडी बाबत ‘लोकल’ सेटलमेंटचा भाजपाचे प्रादेशिक पातळीवरील आणि देश पातळीवर 400 पार चा नारा देणारे नेते काही ठाम निर्णय घेणार की ते देखील ‘पैसा’ हाच निकष ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खरेतर लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यापासून हा मतदारसंघ भाजपसाठी पोषक राहिलेला आहे. मात्र येथील स्थानिक नेत्यांना ही निवडणूक म्हणजे सोन्याची खाण ठरली आहे. मतदार मोदी किंवा हिंदुत्व तर कधी कधी काँग्रेस नको म्हणून भाजपाला मतदान करतात, मात्र स्थानिक नेते हे आपलेच कर्तृत्व आणि यश असल्याचे भासवतात आणि आपणच मालक असल्याचे भ्रामक चित्र तयार करून नवनवीन बकरे शोधत असतात. 

हे सारे ‘लोकल राजकारण’ प्रदेश कार्यालयात अनेकदा हमरीतुमरीवर चर्चेला आले आहे. खरे तर जिल्ह्यातील एकूण एक नेत्यांची कामगिरी पक्षाला माहित आहे. पक्ष निर्णय घेत नाही कि पक्ष नेत्यांची काही मजबुरी आहे, हे अद्याप कोणाला कळलेले नाही. कारण स्थानिक नेते सतत भूमिका बदलत असतात. हातात असलेल्या अधिकाराचा आणि पदाचा अतिरेकी वापर करतात. तरीही पक्ष कोणताही निर्णय घेत नाही, याचा एकच अर्थ निघतो हे सारे पक्षाला मान्य आहे किंवा पक्षा पेक्षा हे स्थानिक नेते मोठे आहेत.

आजच्या घडीला लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर सर्व कांही पैसा एके पैसाच आहे. लातूर लोकसभा मतदार संघ हा फक्त पैसेवाल्यांचा मतदार संघ असल्याचे चित्र लातूर ‘राखीव’ लोकसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे. जर लातूर राखीव मतदार संघाची उमेदवारी पाहिजे असेल तर काम, ओळख, पक्षातील योगदान महत्वाचे नाही तर ‘फक्त आणि फक्त पैसा’ महत्त्वाचा आहे, हा मेसेज सर्वश्रुत आहे. एका नेत्यासोबत ‘आहेराची बोलणी’ करून त्यांना हवे तेवढे पैसे दिले की बाकीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची काहीही गरज नाही अशी विकलांग अवस्था लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाची झाली आहे.

ज्याला तिकट हवे त्याच्याकडे पैसा असला की बाकी काहीच करायची गरज नाही. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांच्यासह माजी आमदार सुधाकर भालेराव, निवृत्त सनदी अधिकारी नामदेव कदम, उदगीर मधून 2019 ला असलेले भाजपचे विधानसभा उमेदवार अनिल कांबळे ही प्रमुख नावे कायम चर्चेत आहेत.  

या इच्छुकांची ओळख, काम असल्याने यांनी दावा केला तर तो स्वाभाविक आहे, असे कोणालाही वाटू शकते. मात्र मागील काही काळ पहिला तर माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या परिवारातुन कोणाचे न कोणाचे नाव ठरवून पुढे आणले जात आहे. त्याला माध्यमातील काही जण कायम ‘हवा’ मदत करीत असतात. दिड दोन वर्षांपासून अनिल गायकवाड यांचे नाव पुढे आले, मात्र त्यांची ऐनवेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे त्यांचे नाव एकाएकी मागे पडले. 

त्यानंतर लगेच अनिल गायकवाड यांचे चिरंजीव अश्वजित गायकवाड यांना समोर आणले जाऊ लागले. मात्र अश्वजित गायकवाड यांनी नवी मुंबई येथे प्रिया सिंग या युवतीसोबत केलेल्या प्रकारामुळे त्यांचे नाव आपोआप मागे पडले. काही दिवस गेल्यानंतर अनिल गायकवाड यांचे दुसरे सुपुत्र विश्वजीत गायकवाड यांचे नाव पुढे आणले गेले. लातूर जिल्ह्यातील ‘सनदी अधिकारी’ हीचं ओळख असलेले अनिल गायकवाड आणि लातूरचा फारसा संबंध नाही आणि त्यांचा जिल्ह्यात कोणासोबत संपर्क देखील नाही हे वास्तव आहे.

अनिल गायकवाड यांचे पक्षातील योगदान, जिल्ह्यातील लोकांशी संबंध, स्थानिक समस्यांची आणि प्रश्नांची माहिती, पक्षातील पदाधिकाऱ्यांची ओळख हा विषय तर लांब लांबपर्यंत नाही. एका कार्यकर्त्याची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे, जर विश्वजित गायकवाड यांना तिकीट हवे असेल तर जिल्ह्यातील 10 तालुक्याची नाव आणि त्या तालुक्याच्या अध्यक्षांची नाव एका दमात सांग म्हणावं’ या एका प्रतिक्रियेत सारे सामावलेले आहे.

हे सारे वास्तव असताना मागील कांही दिवसापासून भाजप नेते संभाजी निलंगेकर पाटील हे ठरवून विश्वजीत गायकवाड यांना पुढे करत आहेत, आता यात त्यांचा उद्देश काय आहे. किती पक्षहित आणि किती मतदार संघाची काळजी आहे, हे आता सर्वाना चांगलेच ठाऊक आहे. विश्वजित गायकवाड यांच्यावर एकाएकी मेहरबान झालेले नेते तिकीट का द्यावे? याचे समर्पक आणि कार्यकर्त्यांना पटेल असे उत्तर देऊ शकतील का? असा प्रश्न कोणाला पडत नाही आणि पडला तरी त्याचा काहीही उपयोग नाही, असे एकूण चित्र आहे.

विश्वजीत गायकवाड यांचे चुलते आणि माजी खासदार सुनील गायकवाड यांची उमेदवारी 2019 च्या निवडणुकीत संभाजी निलंगेकर पाटील यांनी कापली असा जाहीर आरोप सुनील गायकवाड आज देखील करत असतात. सोशल मिडीयावर पोस्ट टाकून जाहीर शेर शायरी, स्टेट्स ठेवून आरोप करीत असतात. संभाजी निलंगेकर पाटील यांना उपदेश करतात, टोमणे मारतात, सोशल मिडीयावर घोर अपमान करतात. कर्माची फळे आहेत असे म्हणत असतात. 

त्यामुळे गायकवाड परिवार आणि भाजपचा म्हणावा तसा संबंध कधी राहिलाच नाही. ‘चला हवा येऊ द्या’ एवढे म्हणण्या पुरता संबंध राहिला होता. तो एकाएकी दृढ झाला आहे. एवढी फाकलेली मने रातोरात कोणत्या कारणाने जुळली याचे कोडे कार्यकर्त्यांना पडले आहे. 2009 असेल किंवा 2014 या दोन्ही लोकसभा निवडणूकीत सुनील गायकवाड यांचा पराभव आणि विजय या दोन्ही गोष्टीत काँग्रेसची खेळी आणि कुटील रणनीतीचे परिणाम होते हे जगजाहीर आहे. 2009 साली काँग्रेसचे उमेदवार जयंत आवळे यांना निवडून आणणे ही स्थानिक काँग्रेस नेतृत्व विलासराव देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय होता, त्यामुळे पराभव झालेले जयंत आवळे हे विजयी घोषित करण्यात आले, असे कायम बोलले जाते.

त्या निकालात अनिल गायकवाड या सनदी अधिकाऱ्याची भूमिका खूप मोठी होती, हे जगजाहीर आहे. यात लपलेले आणि कोणाला माहित नाही असे काही नाही. ज्याला लातूरचे थोडेसे राजकारण कळते त्याला हे सर्व माहित आहे. पुन्हा 2009 साली झालेल्या निवडणुकीत पराभवाचे ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून 2014 ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सुनील गायकवाड यांना विजयी करण्यासाठी केलेली छुपी मदत सर्वश्रुत आहे. पुढची पाच वर्षे सुनील गायकवाड आणि स्थानिक काँग्रेस नेते यांचे मधुर संबंध कसे आणि काय होते हे उघड आहे. यामागे अनिल गायकवाड यांच्या आर्थिक साम्राज्याची जोड कायम होती, हे कोणाला नाकारता येणार नाही. 

आता 10 वर्षानंतर आज देखील तीच बाजू समोर येत आहे. आज देखील त्याच अनिल गायकवाड यांची आर्थिक बाजू बघून तोच उमेदवारीचा निकष ‘स्थानिक’ भाजप नेते संभाजी निलंगेकर पाटील हे ठरवत आहेत असा जाहीर आरोप होत आहे. खरे तर विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांची मागील पाच वर्षातील कामगिरी समाधानकारक आहे. सुधाकर शृंगारे यांचे पक्षातील सर्व नेत्यांसोबत असलेले ‘संबध’ आणि कोणालाही त्यांचा नसलेला त्रास आणि सर्वसमावेशक प्रतिमा ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू देखील आहे. 

हे सारे एकीकडे असले तरी दुसरीकडे मागील पाच वर्षाचा विचार केला तर जिल्ह्याचे नेते म्हणून संभाजी निलंगेकर पाटील यांच्याबद्दल खासदार सुधाकर शृंगारे हे अतिशय प्रामाणिक राहिलेले ‘खासदार’ आहेत. याउलट निलंगेकर समर्थक म्हणून त्यांच्या सोबत राहिल्याने सुधाकर शृंगारे यांना जिल्ह्यातील व राज्यातील अनेक नेत्यांचा त्रास सहन करावा लागला, हे निलंगेकर यांना देखील चांगलेच माहित आहे.

सुधाकर शृंगारे यांनी कितीही त्रास झाला तरी आपली भूमिका बदलली नाही, निलंगेकर यांच्यासोबत बंडखोरी केली नाही, साथ आणि सोबत सोडली नाही. सोयीचे राजकारण केले नाही. कधीही आणि केव्हाही आर्थिक तर सोडा राजकीय स्वार्थासाठी पक्षासोबत कधीही बेईमानी केली नाही. गटबाजी केली नाही. गटबाजीला मदत केली नाही. कोणाच्या दबावाला बळी पडून पक्ष विरोधी काम केले नाही. राजकीय सौदेबाजी केली नाही. अर्थात जिल्ह्यातील इतर जबाबदार नेत्यांची बेजाबदार वागणूक सर्वांना माहित आहे. गटबाजी, दगाबाजी हा नेत्यांचा स्थायी स्वभाव बनला आहे.

या सर्व कुटील कारस्थानी नेत्यांच्या राजकारणाला जवळून पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील सुधाकर शृंगारे यांच्या नावाची शिफारस केली आहे. हीच त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती म्हणावी लागेल. शासकीय यंत्रणेने जमा केलेल्या सर्व्हे मध्ये सुधाकर शृंगारे हे नंबर वन आहेत. या शिवाय पक्षातील अनेक पदाधिकारी आणि नेत्यांची पसंती देखील सुधाकर शृंगारे यांना आहे हे आता उघडपणे समोर येऊ लागले आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पक्षाने लातूरला निरीक्षक म्हणून अतुल सावे यांना पाठवले असता जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांची मते अतुल सावे यांनी जाणून घेतली, त्यात मुंबई येथून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 80 टक्के पसंती विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना दिली असल्याची माहिती आहे.

जे बाकीचे 20 टक्के उरले आहेत ते सर्व उमेदवार आणि त्यांच्या गटाचे समर्थक आहेत अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या बैठकीत संभाजी निलंगेकर पाटील यांनी विश्वजीत गायकवाड यांचे नाव घ्या, त्यांचे नाव पुढे करा अश्या सूचना, आदेश दिले होते. अनेकांना पर्सनल फोन करून ताकीद दिलेली असताना देखील त्यातील अनेकांनी सुधाकर शृंगारे यांचे नाव घेतले आहे. आता विषय थेट अर्थकारणाशी जोडले गेल्याने स्थानिक नेत्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

विश्वजीत गायकवाड यांचे नाव निलंगेकर घेत आहेत, त्याचे कारण ‘अर्थकारण’ असल्याचे कार्यकर्ते उघड बोलत आहेत. पक्षातच सुरू असलेल्या चर्चेनुसार ‘आर्थिक डील’ झाल्याने विश्वजीत गायकवाड यांचे नाव ठरवून पुढे केले जात आहे. जिल्ह्याच्या नेत्याने सांगून देखील पदाधिकारी एखाद्याचे नाव घेत नसतील तर ही बाब नक्कीच आत्मचिंतन करण्याची आहे. मागील पाच वर्षात सत्ता ‘हातात’ नसल्याने अस्वस्थ स्थानिक नेत्यांनी संधीचे सोने करावे म्हणून विश्वजीत गायकवाड यांच्या मागे लागल्याचे कार्यकर्ते उघड बोलत आहेत, हा आवाज आता पक्ष नेत्यांनी ऐकण्याची गरज आहे.

विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांची जर उमेदवारी पक्षाने नाकारली तर त्याचे एकमेव कारण हे ‘अर्थकारण’ असेल असे आता पक्षातील जेष्ठ नेते उघड बोलत आहेत. कारण इतर सर्व आघाडीवर सुधाकर शृंगारे हे अव्वल आहेत. जिल्ह्यातील पक्षातील नेते असलेल्या पैकी अभिमन्यू पवार यांचा औसा मतदारसंघ लातूर लोकसभेत येत नसल्याने त्यांनी अतुल सावे यांच्या बैठकीत विशेष भूमिका घेतली नाही. मात्र त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी ‘योग्य’ मत मांडल्याची चर्चा आहे. 

अर्थात निलंगेकर यांच्या पोतडीतून विश्वजीत गायकवाड यांचे नाव निघाल्याने पवार गट विश्वजित गायकवाड यांना पसंती देण्याची सुतराम शक्यता नाही. विशेष म्हणजे संभाजी निलंगेकर पाटील यांनी ‘यस’ म्हटल्यावर तर ‘नो-नेव्हर’ हे ठरलेले आहे. मात्र दुसरें नेते रमेश कराड यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मधून आपली पसंती सुधाकर शृंगारे असल्याचे सांगितल्याचे समोर येत आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांची भूमीका स्पष्ट झाली नसली तरी सुधाकर शृंगारे त्यांच्या  तालुक्यातुन येत असल्याने नरो वा कुंजरोवा भूमिका घेण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. 

एकंदरीत आजच्या घडीला तर परिस्थिती विद्यमान खासदारांना अनुकूल आहे. फक्त आर्थिक गणित जुळत नसल्याने विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी कापण्याचा आणि विश्वजीत गायकवाड यांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप नेते संभाजी निलंगेकर पाटील करत आहेत हे उघड दिसत आहे. ज्याला पक्षातील अनेक नेते उघड विरोध करताना दिसत आहेत. जर निलंगेकर यांच्या राजकारणाला प्रदेश पातळीवरून समर्थन आहे की नाही हे देखील अद्याप स्पष्ट नाही. 

मात्र ह्या सर्व बाबी पक्षात उघड बोलल्या जात असताना, दिसत असताना जर पक्षाचे नेते बघ्याची भूमिका घेत असतील तर प्रदेशच्या नेत्यांच्या सूचनेनुसारच ‘सेटिंग आणि सेटलमेंट’ होत आहेत का असा देखील संशय निर्माण व्हायला वाव आहे. त्यामुळे एकंदरीत भाजपसाठी पोषक वातावरण असताना व कांही गरज नसताना ठरवून फक्त आर्थिक स्वार्थ साधला जात नाही म्हणून विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना ठरवून बाजूला केले जात आहे का? याचे उत्तर शोधावे लागणार आहे.

या आर्थिक राजकारणाचे आणि राजकारण्यांचे काय होईल हे लवकर कळेलच, मात्र दर पाच वर्षाला एकदा होणारी आर्थिक देवान घेवाणीची चर्चा  कधी पर्यंत चालणार हा खरा सवाल आहे. या बद्दल आता पक्षातच उघड बोलले जाते आहे. यातून पक्षाचे आणि जनतेचे एक लोकप्रतिनिधी म्हणून निस्वार्थ काम केलेले असताना देखील नेत्यांच्या स्वार्थापोटी जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर याचाही विचार होणे गरजेचे आहे. पैसा महत्वाचा असला तरी पक्ष आणि निष्ठा यांना मूठमाती देणे धोक्याचे आहे.